आमदार सतीश सैल यांचा जामीन रद्द
बेंगळूर : कारवारच्या बेलकेरी बंदरावरून बेकायदेशीरपणे लोहखनिज वाहतूक केल्याप्रकरणात न्यायालयाने कारवारचे आमदार सतीश सैल यांना दिलेला जामीन रद्द केला आहे. त्यामुळे आमदार सैल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना पुन्हा अटक होण्याची शक्यता आहे. बेलकेरी बंदरातून बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणी 25 ऑक्टोबर रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने सतीश सैल यांना अंतरिम जामीन मंजूर केला होता. वैद्यकीय उपचारासाठी हा जामीन देण्यात आला होता. उपचारासाठी जामीन कालावधी वाढवून देण्याची विनंती त्यांनी केली होती. त्यानुसार लोकप्रतिनिधी न्यायालयाने 7 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या जामीन कालावधीत वाढ केली होती. मात्र सोमवारी हा जामीन रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे सतीश सैल यांना पुन्हा कारागृहात जावे लागणार असल्याचे सांगितले जात आहे. बेलकेरी बंदरातून बेकायदा खनिज वाहतूक केल्याप्रकरणी आमदार सैल यांना लोकप्रतिनिधी न्यायालयाने दोषी ठरविले होते. त्यांनी उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती मिळविली होती.