आमदार सतीश सैल यांनी मद्यलॉबीशी संबंध असल्याचे स्पष्ट करावे
कारवार-अंकोलाच्या माजी आमदार रूपाली नाईक यांची पत्रकार परिषदेत मागणी
कारवार : कारवार-अंकोलाचे आमदार सतीश सैल यांचे संबंध गोव्यातील की कर्नाटकातील मद्यलॉबीशी आहेत हे स्पष्ट करावे, अशी मागणी कारवार-अंकोलाच्या माजी आमदार रूपाली नाईक यांनी केला आहे. मंगळवारी येथील पत्रकार भवनात पत्रकारांशी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, 4 नोव्हेंबरला कर्नाटक-गोवा सीमेवरील माजाळी चेकनाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी बिदरहून गोव्याकडे जाणारे टँकर अडवले. टँकरमधील स्पिरीट मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणार होते, असे स्पष्ट झाले आहे. या स्पिरीट वाहतूक प्रकरणात आमदार सैल सामील आहेत. त्यामुळे त्यांनी आमदारपदाचा राजीनामा देण्याची आग्रही मागणी नाईक यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, माजाळी तपासणी नाक्यावर अबकारी अधिकाऱ्यांनी अडवून ठेवलेल्या टँकरमध्ये मद्यनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे स्पिरीट आहे हे माहीत असूनसुद्धा सैल यांनी सोमवारी तपासणी नाक्यावर दाखल होऊन टँकर सोडून देण्यासाठी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. ताब्यात घेतलेला टँकर गोव्याला पाठवून देण्याची घाई सैल यांना लागून राहिली होती. या प्रकरणात आमदार सैल यांचे निकटवर्तीय शंभु शेट्टी व अन्य समर्थकांचा सहभाग आहे. आमदार सैल यांनी जनतेची सेवा करायची सोडून मद्यविक्रीच्या दुकानांना बेकायदेशीर स्पिरीट वाहतूक करणाऱ्या व गुंडगिरी करणाऱ्यांना समर्थन देत आहेत, असा गंभीर आरोप नाईक यांनी केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या प्रकरणाची कसून चौकशी करावी. अन्यथा सैल यांच्या आक्षेपार्ह कृती विरोधात आंदोलन छेडू, असा इशारा रूपाली नाईक यांनी दिला आहे.