आमदार सतेज पाटील यांनी नोंदविला मतदानाचा हक्क
कोल्हापूरः
आमदार सतेज पाटील यांनी आज मतदान केले. यावेळी माध्यमांशी बोलताना, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे स्थिर सरकार येणार असल्याचा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
आमदार पाटील म्हणाले, महाराष्ट्रात प्रचंड उत्साहात मतदान सुरू आहे. अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत महायुतीच्या सरकारला घरी बसून नव स्थिर महाविकास आघाडीचं सरकार निर्माण करण्याचा निर्धार महाराष्ट्राच्या जनतेने केलेला आहे.
यावेळी मतदानासाठी पैसे वाटपाविषयी विचारणा झाल्यास आमदार पाटील म्हणाले, हे खोकेवाले सरकार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे. पैसे घेऊन उद्याची महागाई, बेरोजगारी अंगावर घ्यायची नाही असा निर्णय जनतेने घेतलेला आहे. महाराष्ट्राची देशपातळीवरील इमेज बदल्याण्यासाठी सूज्ञ जनता महाविकास आघाडीला मतदान करेल याची आम्हाला खात्री आहे.
महाराष्ट्रात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आमदारच पळून जातात, पक्ष फुटतात यामध्ये जनतेला स्थिर सरकार हवे आहे आणि जे महाविकास आघाडीच निर्माण करु शकते असा विश्वास जनतेला असल्याचेही आमदार पाटील म्हणाले.
मतदानाच्या आधी गाड्यांची तोडफोड, ऑडीओ क्लिप बाहेर काढणे हा षडयंत्राचा भाग आहे. काल विरार मध्ये जी घटना घडली त्याचा उतारा म्हणून काहीतरी काढायचं, आणि ती बातमी कील करण्याचा प्रयत्न करायचा हे सरकार करत आहे. परंतु सत्य लोकांना माहित आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीला प्रचंड बहुमत मिळणार आहे, असे वक्यव्य आमदार पाटील यांनी केले.
आम्ही कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा घेऊन पुढं जात आहोत. जिल्हा आर्थिकदृष्ट्या संपन्न करणे, रोजगार उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांना न्याय देणे या आमच्या भूमिका आहेत. राज्य सरकारची मुदत संपण्याआधी दोन दिवस सरकार स्थापना, याचा अर्थ राज्यपाल राजवट आणायची आणि खेळ करत बसायचा असे या सरकारचे काम आहे. परंतु माझी महाराष्ट्राच्या जनतेला विनंती आहे, राज्यात १८० महाविकास आघाडीचे उमेद्वार निवडून द्या , आणि या सरकारला पर्यायचं ठेवू नका. स्थिर सरकार ही महाराष्ट्राच्या प्रगतीची गरज आहे, असे मत आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केले.
गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य हे दिवा स्वप्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे आमचे सरकार येणार आणि आमचाच मुख्यमंत्री होणार असा विश्वासही आमदार पाटील यांनी दर्शविला.