गडमुडशिंगीच्या यशवंत सागर तलावाला ४ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर
आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; १ कोटीचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास मान्यता
कोल्हापूर/प्रतिनिधी
राज्य सरकारच्या सरोवर संवर्धन योजनेंतर्गत गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील यशवंत गंगासागर तलावाचे पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने ४ कोटी २८ लाखांच्या निधीस तत्त्वतः मान्यता दिली. आमदार ऋतुराज पाटील यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेसाठी १ कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
राज्यातील तलावांच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सरोवर संवर्धन योजना राबविण्यात येत आहेत. यातून तलावाच्या पाण्याचे प्रदूषण करणारे स्रोत निश्चित करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणे, तलावातील गाळ व जलपर्णी काढणे, पाण्याची गुणवत्ता सुधारणे तसेच कुंपण घालणे, सुशोभीकरण, हरित पट्टा विकसित करणे, बालोद्यान, नौकाविहार आदी कामे करण्यासाठी निधी दिला जातो. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने शासनाला प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर जुलै २०२३ मध्ये सुकाणू समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाच्या अधीन राहून या निधीस मान्यता मिळाली. त्यापैकी १ कोटीचा निधी जिल्हा परिषदेला वर्ग करण्याचे आदेश ११ जानेवारी रोजी पर्यावरण विभागाने काढला आहे.
कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी या योजनेसाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरवा केला होता. आमदार ऋतुराज पाटील यानी या प्रकल्पास अंतिम मान्यता देऊन उर्वरित निधी तात्काळ उपलब्ध करण्याची विनंती पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिवांना ०८ डिसेंबर २०२३ रोजीच्या पत्राद्वारे केली होती. त्यानुसार या योजनेस मान्यता देऊन १ कोटीचा निधी कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याना वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली.
या योजनेस मान्यता देऊन निधी मंजूर केल्याबद्दल आमदार ऋतुराज पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.