आमदार राजू सेठ यांच्याकडून वसतिगृह अधिकारी-कर्मचारी धारेवर
विद्यार्थ्यांना उत्कृष्ट जेवण देण्याची समज
बेळगाव : शहरातील वसतिगृहांच्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याने बुधवारी आमदार राजू सेठ यांनी वसतिगृहांची पाहणी करत तेथील जेवणाच्या दर्जाची तपासणी केली. अळ्या आढळलेल्या वसतिगृहातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले. विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून चांगल्या दर्जाचे धान्य पुरविले जाते. त्यामुळे चांगल्या प्रकारे अन्नपदार्थ तयार करून देण्याच्या सूचना केल्या. चार दिवसांपूर्वी एका वसतिगृहाच्या जेवणात अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या पार्श्वभूमीवर आमदार राजू सेठ यांनी बुधवारी रामतीर्थनगर येथील देवराज अर्स बॉईज हॉस्टेल, डॉ. बी. आर. आंबेडकर गव्हर्नमेंट बॉईज हॉस्टेल, मायनॉरिटी वेल्फेअर डिपार्टमेंट हॉस्टेल, एसटी बॉईज हॉस्टेल यांना भेट देऊन तेथील जेवणाची गुणवत्ता तपासण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. अधिकाऱ्यांकडून निष्काळजीपणा होत असल्याने आमदारांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना धारेवर धरले. निकृष्ट जेवणाचे वितरण केल्यास कारवाई करण्याचा इशाराही दिला. यावेळी नगरसेवक अॅड. कोंगाळी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.