कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आमदार राजू कागेही नाराज

06:36 AM Jun 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्वपक्षावर उघडपणे टीका : राजीनामा देण्याचा इशारा : सरकारच्या अडचणीत भर : विरोधकांकडून सरकारवर निशाणा

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव, बेंगळूर

Advertisement

राज्यातील काँगेस सरकारच्या कार्यपद्धतीवर सत्ताधारी पक्षातील आमदारच नाराजी व्यक्त करत आहेत. आळंदचे आमदार बी. आर. पाटील यांनी राज्य पाठोपाठ कागवाडचे आमदार राजू कागे यांनी देखील सरकारवर उघडपणे टीका केली आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी सरकारला केंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याने सरकारच्या अडचणीत भर पडली आहे.

राज्याच्या नीति आणि नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष असणारे आमदार बी. आर. पाटील यांनी गृहनिर्माण खात्याचे मंत्री जमीर अहमद खान यांच्या स्वीय सचिवांशी फोन करून केलेल्या संभाषणाची ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. गृहनिर्माण खात्यातील घरे मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना लाच द्यावी लागत असल्याचा आरोप सरकारवर झाल्याने गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याच दरम्यान, राजू कागे यांनी  टीका करत नाराजी व्यक्त केल्याने सरकारची डोकेदुखी आणखी वाढली आहे. त्यामुळे नाराज आमदारांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना कसरत करावी लागणार हे नक्की.

राजीनामा दिला तरी आश्चर्य नाही!

ऐनापूर येथे रस्ताकामाच्या शुभारंभप्रसंगी आमदार राजू कागे यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. राज्यातील सरकारी व्यवस्था सांगण्यासारखी झालेली नाही. आमच्याच पक्षाचे नेते बी. आर. पाटील यांना आलेला अनुभव आता मलाही येत आहे. त्यामुळे आता या व्यवस्थेला कंटाळलो आहे. सरकारच्या  प्रशासकीय कार्यपद्धतीकडे पाहिले तर मी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री आमदारपदाचा राजीनामा दिला तर आश्चर्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

या व्यवस्थेला आता मी कंटाळलो

येथील बहुतेक ठेकेदार स्वत: काम मिळवतात तसेच ती इतरांना देतात. दोन-दोन वर्षे पूर्ण झाली तरी ती कामे पूर्ण करत नाहीत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी विशेष निधी म्हणून 25 कोटी रुपये मंजूर केले आहेत. निधी मंजूर करुन दीड वर्ष लोटले तरी संबंधित कामे सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आलेला नाही. पुरेसे अनुदान मिळाले नसल्याने विकासकामेही नाहीत. ही सरकारची प्रशासकीय भूमिका आहे, असे सांगून त्यांनी विविध खात्यांचे अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर सडकून टीका केली. या व्यवस्थेला आता मी कंटाळलो आहे. मला आमदार म्हणून काम करण्याची इच्छा नाही. मी राजीनामा देण्याच्या मन:स्थितीत आहे. दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांना भेटेन. राजीनामा दिला तरी आश्चर्य नाही, अशी निराशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

आमदार बी. आर. पाटील यांनी जे सांगितले ते खोटे नाही. माझी परिस्थितीही याहून वेगळी नाही. बी. आर. पाटील यांच्या वक्तव्याशी मी सहमत आहे. आमच्या सरकारमधील कोणताही अधिकारी नीट काम करत नाही. प्रशासकीय व्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे, असे परखड मतही आमदार कागे यांनी मांडले आहे.

गृहनिर्माण मंत्र्यांच्या राजीनाम्याची आमदार गोपालकृष्ण यांची मागणी

गृहनिर्माण खात्याकडून घरे मिळविण्यासाठी लाच द्यावी लागते, अशा संभाषणाची आमदार बी. आर. पाटील यांची ध्वनिफित व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांबरोबरच सत्ताधारी काँग्रेसमधील आमदारानेही मंत्री जमीर अहमद खान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. शिमोगा जिल्ह्यातील सागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बेळूर गोपालकृष्ण यांनी गृहनिर्माण मंत्री जमीर अहमद खान  यांच्यावर आरोप झाला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे. जर निर्दोष असेल तर पुन्हा मंत्रिमंडळात सामील व्हावे. यापूर्वी आरोप झाल्यानंतर मंत्र्यांनी राजीनामा दिल्याचे उदाहरणे आहेत. त्याचप्रमाणे मंत्री जमीर अहमद यांनीही राजीनामा देणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

 आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करेन : सिद्धरामय्या 

राज्य काँग्रेसमधील आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करेन. बी. आर. पाटील यांना रायचूरला येण्यास सांगितले आहे. मात्र, कार्यक्रमाला निमंत्रण नसल्याने मी येणार नसल्याचे त्यांनी कळविले आहे. 25 जून रोजी भेटीसाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली.

कागवाड मतदारसंघातील आमदार राजू कागे यांच्या वक्तव्याविषयी मला माहीत नाही. त्यांच्याशीही चर्चा करेन. ‘मुख्यमंत्र्यांचे विशेष अनुदान’ अशी कोणतीही तरतूद नाही. अर्थसंकल्पात अशा पद्धतीचा कोणताही उल्लेख नाही. राजू कागे यांना मुख्यमंत्र्यांचे विशेष अनुदान कोणत्या स्वरुपात देण्यात आले आहे, हे मला ठाऊक नाही. आवश्यकता असेल तिथे विशेष अनुदान द्यावे लागते. परंतु, मुख्यमंत्र्यांचे अनुदान असे काहीही नसते, असे स्पष्टीकरण सिद्धरामय्या यांनी दिले.

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article