For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिरोळात गटातटाच्या राजकारणातून तिरंगी लढत...? आमदार राजेंद्र पाटील विरुद्ध गणपतराव पाटील की उल्हास पाटील ?

12:26 PM Feb 20, 2024 IST | Abhijeet Khandekar
शिरोळात गटातटाच्या राजकारणातून तिरंगी लढत     आमदार राजेंद्र पाटील विरुद्ध गणपतराव पाटील की उल्हास पाटील
Advertisement

पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक

बाळासाहेब माळी शिरोळ

शिरोळ तालुक्यात पक्षीय राजकारणापेक्षा गटातटाचे राजकारण अधिक आहे. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट, स्वाभिमानी शेतकरी संघटनांसह घटक पक्षांची महाविकास आघाडी विरुद्ध विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शह देण्यासाठी दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक यांच्यापैकी महाविकास आघाडीतर्फे कोणाला उमेदवारी देणार, यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून आहे.

Advertisement

विद्यमान आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर अपक्ष म्हणून निवडून आले, त्यांनी सुरुवातीला महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन मंत्रिपदही मिळवले. मध्यंतरीच्या काळात मुख्यमंत्री शिंदे गटाला त्यांनी पाठिंबा दिला. भाजप, शिवसेना शिंदे गटांच्या महायुतीमधून त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिरोळ तालुक्यात अनेक विकासकामे केली असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर राष्ट्रीय काँग्रेसचे गणपतराव पाटील हे दत्त कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत तालुक्यात क्षारपड जमीन सुधारणा, गोपालन, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. शेतकरी मेळाव्यांसह अन्य उपक्रम राबवत आहेत. त्यांचे वडील, माजी आमदार कै. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांची पुण्याई या निवडणुकीमध्ये फळास येणार का? हा प्रश्न आहे. गणपतराव पाटील शांत, संयमी निगर्वी सतत शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रयोग राबवत आहेत. वयाच्या 76 वर्षीही ते कारखान्याबरोबरच अनेक संस्था उत्कृष्टपणे चालवत आहेत.

Advertisement

शिरोळ मतदारसंघात विद्यमान अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक यांच्यासह अन्य कार्यकर्ते इच्छुक असले तरी विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीने एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी एकला चलो रे भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीतर्फे ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. खासदार धैर्यशील माने यांनी तालुक्यात विकासकामांच्या बळावर मताधिक्य मिळेल, असा दावा त्यांच्या समर्थकांत केला जात आहे. पाच वर्षापासून माजी खासदार राजू शेट्टी यांनी वेगवेगळ्dया आंदोलनांतून जनतेत मिसळण्याचा प्रयत्न केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील शंभर रुपये व चालू शंभर रुपये अधिक मिळवण्यात त्यांनी यश मिळवले आहे. परंतु मागील शंभर रुपये शेतकऱ्यांच्या पदरात अद्याप पडलेले नाहीत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पेरणी केली आहे.

तालुक्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी आमदार उल्हास पाटील यांनीही कंबर कसली आहे. वेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवला आहे. विधानसभेच्या पूर्वी लोकसभा निवडणूक होणार असल्याने राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने साथ दिल्यास विधानसभेसाठी राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याची शक्यता आहे. खासदार धैर्यशील माने यांनाच महायुतीतर्फे उमेदवारी निश्चित मानली जात आहे.

आमदार राजेंद्र यड्रावकर पाटील हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. सध्या त्यांनी शिवसेना शिंदे गटाला पाठिंबा दिला असून त्यांनाच महायुतीतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे गणपतराव पाटील यांचे नाव आघाडीवर राहील, अशी चर्चा आहे. परंतु गणपतराव पाटील हे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, हे अद्याप गुलदस्तात आहे. शिरोळ तालुक्यात त्यांच्या समर्थकांमधून गणपतराव पाटील यांना आमदार करण्यासाठी आतापासूनच कार्यकर्ते आखणी करत आहेत. तालुक्यात भाजप, शिवसेना शिंदे गट महायुतीतर्फे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनाच उमेदवारी मिळेल, तालुक्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी सावध भूमिका घेतली असून प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळीच त्याची ताकद समजणार आहे एकंदरीत शिरोळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार.. हे निश्चित.

Advertisement
Tags :

.