बेंगळूर चलो कार्यक्रमात आमदार मुनिरत्न यांचा गोंधळ
बेंगळूर : उपमुख्यमंत्री तथा बेंगळूर शहरविकास मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या बेंगळूर चलो कार्यक्रमात भाजप आमदार मुनिरत्न यांनी गोंधळ घातल्याचा प्रसंग रविवारी घडला. शनिवारपासून लालबागमध्ये बेंगळूर चलो कार्यक्रमाला सुरुवात करून उपमुख्यमंत्र्यांनी सार्वजनिकांकडून त्यांच्या समस्यांबद्दल निवेदन स्वीकारले होते. रविवारी सकाळी मत्तीकेरेच्या जे. पी. पार्कमध्ये नागरिकांकडून निवेदन स्वीकारत असताना स्थानिक आमदार मुनिरत्न यांनी आपल्याला या कार्यक्रमाला निमंत्रण दिलेले नाहीत, असे म्हणत गोंधळ घातला. उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी रविवारी सकाळी जे. पी. पार्कमध्ये येऊन नागरिकांसमवेत मॉर्निंग वॉक केले. यानंतर या कार्यक्रमात सहभागी होऊन नागरिकांकडून निवेदने स्वीकारत होते. दरम्यान, नागरिकांमध्ये बसलेल्या आमदार मुनिरत्न यांना शिवकुमार यांनी व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर जाऊन मुनिरत्न यांनी डी. के. शिवकुमार यांच्याकडे असलेले माईक हिसकावून या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण देण्यात आलेले नाही. आरएसएसचे पथसंचलन संपल्यानंतर मी येथे आलो आहे. नागरिकांमध्ये बसून मी या कार्यक्रमात सहभागी होतो, असे म्हणत नागरिकांमध्ये जाऊन बसले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.