आमदार मुनिरत्न यांना पुन्हा अटक
अत्याचार प्रकरणात रामनगरच्या कग्गलिपूर पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
जात अवमानना प्रकरणात जामीन मिळालेल्या बेंगळूरमधील राजराजेश्वरीनगरचे आमदार मुनिरत्न नायडू यांना अत्याचार प्रकरणात पुन्हा अटक करण्यात आली आहे. रामनगर जिल्ह्यातील कग्गलिपूर पोलिसांनी मुनिरत्न यांना अटक केली आहे. जात अवमानना प्रकरणात गुरुवारी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने मुनिरत्न यांना जामीन मंजूर केला होता. शुक्रवारी बेंगळूरच्या परप्पन अग्रहार कारागृहातून जामीनावर मुक्तता होताच अत्याचार प्रकरणात मुनिरत्न यांना ताब्यात घेऊन कग्गलिपूर पोलीस स्थानकात नेण्यात आले. नंतर अटक करून चौकशी सुरू करण्यात आली. रामनगर जिल्ह्यातील मागडी उपविभागाचे डीवायएसपी प्रवीण आणि रामनगर उपविभागाचे डीवायएसपी दिनकर शेट्टी यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली. राजराजेश्वरीनगर येथील 40 वर्षीय महिलेने 2020 ते 2022 या कालावधीत मुनिरत्न यांनी आपल्यावर अत्याचार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप करत रामनगर जिल्ह्यातील कग्गलिपूर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. या पाश्वभूमीवर सात जणांविरुद्ध पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता.
मुनिरत्न यांना धक्का
दरम्यान, अत्याचार प्रकरणात आमदार मुनिरत्न यांनी दाखल केलेली जामीन याचिकेवरील सुनावणी 23 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. सरकारी पक्षाच्या वकिलांनी आक्षेप दाखल करण्यासाठी मुदत मागितल्याने बेंगळूरमधील लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली आहे. त्यामुळे मुनिरत्न यांना कारागृहातच राहावे लागणार आहे.