Karad : आमदार मनोजदादा घोरपडे रंगले भजनात !
जोतिबा पावक्ताच्या रस्त्यासाठी प्रयत्न करण्याची आमदार घोरपडे यांची ग्वाही
मसूर : कराड तालुक्यातील हेळगावसह परिसरातील भाविक भक्तांचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबाच्या पावक्ता डोंगरावरील मंदिरास कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी भेट दिली.
या मंदिरात प्रत्येक पौर्णिमेला भजन, पूजाआर्चा, आरती, महाप्रसाद असा उत्सब असतो. या उत्सवात मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत आमदार भजनात रंगून गेले. तसेच येथील हजारो भाविकांचे कुलदैवत असलेल्या डोंगरावरील पुरातन श्री जोतिबा पावक्ताच्या मंदिराकडे येण्यासाठी डोंगराच्या दोन्ही बाजूला रस्ता करण्याची ग्वाही यावेळी आमदार मनोज घोरपडे यांनी दिली.
कराड तालुक्यातील हेळगाव, पाडळी, कचरेवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, निगडी, हणबरवाडी, घोलपवाडी, गायकवाडवाडी आदी गावातील जनतेचे कुलदैवत असलेल्या श्री जोतिबा पावक्ता मंदिर हेळगाव आणि हणबरवाडीच्या मध्यावर डोंगरावर आहे. या मंदिराला पायथ्यापासून वर जाईपर्यंत रस्त्याचा प्रश्न गंभीर होता.
याबाबत या परिसरातील नागरिकांनी आमदार मनोज घोरपडे यांच्याकडे रस्त्याची मागणी केली होती. आमदार घोरपडे हे नुकत्याच पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमासाठी डोंगरावर पायथ्यापासून नागरिकांसमवेत चालत गेले. तेथे सुरू असलेल्या भजन आणि आरती उत्सवात सहभागी होत
महाप्रसादाचा आस्वाद त्यांनी घेतला. तसेच या मंदिराच्या दोन्ही बाजूला रस्ता करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली.
हेळगावचे सरपंच मिलिंद पाटीलब हणबरवाडीच्या सरपंच सौ जयश्री शेडगे यांनी स्वागत केले. अमर पाटील यांनी आभार मानले. यावेळी भिकोबा पाटील, बापूराव संकपाळ, सचिन पाटील, आबासो पवार, अजय सूर्यवंशी, वैभव इंगळे, अमर पाटील, हरी पाटील, प्रशांत घोलप, बंडा माऊली घोलप आदीसह परिसरातील विविध गावचे पदाधिकारी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.