मेव्हण्या पाव्हण्यांनी घेतली शरद पवारांची भेट ! दोघांनीही केला तिकिटावर दावा
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले असून आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक नेते त्यांची भेट घेत आहेत. मंगळवारी सकाळी पंचशील हॉटेल येथे माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनीही शरद पवार यांची भेट घेत विधानसभेसाठी फिल्डिंग लावली. यावेळी शरद पवार यांनी दोघांनाही स्मितहास्य केले.
विधानसभा निवडणूक जवळ येत आहे. त्याप्रमाणे राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय नेत्यांचे कोल्हापूर दौरे वाढले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार हे सुध्दा सोमवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून पवार यांना भेट घेण्यात येत आहे. सोमवारी रात्री पवार यांचा मुक्काम पंचशील हॉटेल येथे होता. यामुळे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पंचशील हॉटेलमध्ये दाखल झाले होते.
दरम्यान, राधानगरी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार के. पी. पाटील तसेच ए. वाय. पाटील हेसुध्दा याठिकाणी दाखल झाले होते. हॉटेलमधील हॉलमध्ये शरद पवार आल्यावर के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांनी पवार यांना पुष्पगुच्छ देत स्वागत केले. यावेळी त्यांच्यामध्ये चर्चाही झाली.
हे माझंच घर...तिकिटपण मलाच मिळणार
शरद पवारांच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना के. पी. पाटील यांनी आपण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत कधी गेलो नव्हतो असे म्हणत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा कधीच दिला नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा पक्षप्रवेश करण्याचा प्रश्न येत नाही. आपण महाविकास आघाडीसोबतच आहोत असे पवार यांच्याशी बोलून आल्याचे सांगितले. सद्या या राजकीय घडामोडींची जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.
पवारसाहेबांच्या शब्दाखातिर थांबलो...
ए.वाय. पाटील यांना माध्यमांनी छेडले असता त्यांनी गेल्या १० वर्षापासून आपण विधानसभेची तयारी करत असल्याचं सांगितल. गेल्या वेळी मी पवारसाहेबांच्या शब्दाखातिर थांबलो असल्याचं सांगताना यावेळीही राष्ट्रवादीचं तिकिट आपल्यालाच मिळेल असा आशावाद व्यक्त केला.
शरद पवार यांच्या गाडीत समरजित घाटगे
ज्येष्ठ नेते शरद पवार कोल्हापूरात दाखल झाल्यापासून समरजित घाटगे पवार यांच्याबरोबर आहेत. मंगळवारी सकाळीही घाटगे पंचशील हॉटेलमध्ये पवार यांच्या भेटीसाठी गेले. तेथून पवार आणि घाटगे नाष्ट्यासाठी घाटगे यांच्या नागाळा पार्कातील निवासस्थानी गेले. त्यांनी एकाच गाडीतून प्रवासही केला.