खानापुरात कामगार किटचे आमदारांच्या हस्ते वितरण
खानापूर : तालुक्यात कौशल्य कामगारांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. कामगारांनी आपले कौशल्य पणाला लावून आपली कार्यसिद्धता दाखवून द्यावी, तालुक्यातील सर्व स्तरातील कामगारांनी शासनांच्या योजनांचा लाभ घ्यावा, तालुक्यातील कामगारांनी आपल्या कौशल्याचा ठसा महाराष्ट्र, गोवा तसेच इतर राज्यात उमटवलेला आहे. तालुक्यातील कामगारांचा नावलौकीक आहे. यासाठी कामगारांनी आपले नाव शासनाच्या कामगार यादीत दाखल करून शासनांच्या योजनांचा परिवारालाही लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठल हलगेकर यांनी ता. पं. सभागृहात शासनाच्यावतीने कामगारांना किटच्या वितरणावेळी केले.
सुरुवातीला कामगार खात्याच्या अधिकारी एम. विद्या यांनी उपस्थितांचे स्वागत करून कामगारांच्या योजनाबद्दल माहिती दिली. आणि तालुक्यातील कामगारांनी शासनाच्या यादीत आपले नावे नोंदवावीत, असे आवाहन केले. यावेळी ता. पं. कार्यनिर्वाहक अधिकारी विलासराज प्रसन्ना यांनी शासनाच्यावतीने कामगारांना टप्याटप्प्याने किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. पहिल्या टप्प्यात तीनशे कीट उपलब्ध करण्यात आले असून येत्या काहीकाळात तालुक्यातील सर्व कामगारांना किटचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कामगारांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या कुटुंबांच्या माहितीसह आपले नाव कामगार यादीत नोंदवावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी तालुक्यातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.