विधिमंडळात सुनावणी आणि मतदारसंघात स्थितप्रज्ञ आमदार बाबर
विटा प्रतिनिधी
विधीमंडळातील आमदार अपात्रता सुनावणीकडे सबंध देशाचे लक्ष लागून राहिले होते. एकीकडे छातीवर हात ठेवून काही आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते निकालाकडे डोळे लावून बसल्याचे आपण दुरचित्रवाणीवर पाहत होते. मात्र त्याचवेळी शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार अनिल बाबर आपल्या दिनक्रमात व्यस्त होते. उद्घाटन, सभा आणि बैठकांतून व्यस्त राहत त्यांनी पुन्हा एकदा या निकालाचा आपल्यावर काहीच परिणाम होत नसल्याचा स्थितप्रज्ञ भाव दाखवून दिला.
विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आज शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दिला. बुधवारी सकाळपासून या निकालाची धाकधूक आणि उत्सुकता शिवसेनेसह राज्याच्या राजकीय पटलावर होती. अशावेळी या १६ जणांमध्ये ज्यांचा समावेश होता, ते आमदार अनिल बाबर मात्र निरपेक्षपणे या सर्वांकडे पहात असावेत. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल न करता, त्यांनी बुधवारी सांगली येथे होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभाग घेतला. दुपारी चार वाजल्यापासून निकाल येणार होता. मात्र बाबर यांनी साडेतीन वाजता बैठक संपल्यानंतर सांगलीतून थेट आटपाटीकडे प्रयाण केले.
आटपाडी तालुक्यातील बनपूरी, करगणी, शेटफळे, माळेवाडी येथे त्यांचे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि बैठकांचे सत्र सुरू होते. आमदार अनिल बाबर यांच्यासह १६ आमदार पात्र ठरल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केला, तेव्हा आमदार बाबर करगणी येथे होते. त्यांच्या समवेत सांगली जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील आणि आटपाडी तालुक्यातील कार्यकर्ते होते. निकाल समजताच करगणी आणि विट्यात देखिल फटाक्यांची आतिषबाजी करीत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. आमदार बाबर यांना पेढे भरवून कार्यकर्त्यांनी निकालाचे स्वागत केले. मात्र हा सोहळा देखिल अल्पकाळात आटोपून आमदार बाबर यांनी पुढच्या कार्यक्रमासाठी निघणे पसंत केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे संपूर्ण निकाल वाचन आमदार बाबर यांनी चालत्या गाडीत दोन कार्यक्रमांच्या मध्ये मोबाईलवरच पाहणे पसंत केले. या दरम्यान कार्यकर्ते आणि माध्यम प्रतिनिधींच्या फोनला उत्तर देत त्यांनी आपले रूटीन कायम ठेवले. त्यांच्या चेहऱ्यावर निकाल येण्यापूर्वी ना चिंता होती ना निकाल आल्यानंतर खूप मोठा आनंद. आपल्या स्थितप्रज्ञ स्वभावाचे त्यांनी पुन्हा एकदा दर्शन घडवले.
दरम्यान निकालानंतर प्रतिक्रिया देताना आमदार बाबर यांनी हा निकाल समाधानकारक आणि न्याय बाजूचा आहे. विधानसभा अध्यक्षांनी अभ्यास करून निकाल दिला आहे. सर्व बाबी रेकॉर्डवर आणल्या आहेत. सुप्रिम कोर्टाचा फोरम सर्वांना खुला आहे. मात्र त्यांनी जनतेच्या दारात जावे आमची तयारी आहे, असे आव्हान आमदार बाबर यांनी दिले