महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अनिलभाऊ, परत या....!

10:55 AM Feb 02, 2024 IST | Abhijeet Khandekar
MLA Anilbhau Babar
Advertisement

कालच सकाळी टेंभू योजनेचे जनक आमदार अनिलभाऊ बाबर यांचे निधन झाल्याची बातमी समजली, आणि आयुष्यच थांबल्यासारखं झालं, हातपाय गळाले, एका क्षणात अनिलभाऊंचा चेहरा समोर उभा राहिला आणि एकच प्रश्न पडला. निसर्गाला पुन्हा पाझर फुटेल का? काही दैवी चमत्कार होईल का? असा नेता पुन्हा जन्माला येईल का? काहीतरी किमया घडावी आणि घड्याळाचे काटे उलटे फिरावेत, असे राहून राहून वाटत होते. शहाजीचा फोन येईल आणि भाऊ बोलतील, 'आम्ही यायला लागलोय...!' पण घडलेली घटना टळणार नव्हती. नियतीला हे मान्य नव्हते.

Advertisement

काय होतं या दुष्काळी भागात? खडकाळ जमिनी आणि वर्षानुवर्षे निसर्गाशी झगडणारा, लढणारा शेतकरी. अशाच शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला मुलगा मनाशी निश्चय करतो. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना राजकारणात प्रवेश करतो. गावचा संरपच, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचा सभापती होतो. आमदारकी त्यांना खुणावत असते. लोक डोक्यावर घेतात आणि मत आणि निधी दोन्ही त्यांना देतात. देशभरातील गलाई बांधव त्यांच्यावर प्रेम करतात. आणि एका शेतकरी कुटूंबातील छोट्या गावचा मुलगा आमदार होतो. आज हे चित्र स्वप्नवत वाटत असले तरी आमदार अनिलभाऊंनी घडवलेला हा इतिहास आहे, हे पुढच्या पिढीला समजले पाहिजे.
आमदार झाल्यानंतरचा राजकीय प्रवास खडतर होता. मात्र त्या संघर्षातही हा योद्धा ठामपणे उभा राहिला, लढला आणि जिंकला सुद्धा. सलग सात विधानसभा निवडणूका लढवल्या. चार जिंकल्या आणि तिन हरल्या देखिल. मात्र जिंकल्याचा कधी उन्माद केला नाही आणि हरल्या म्हणून खंत नाही. जनतेचा कौल नेहमीच शिरोधार्य मानून कार्यरत राहिले. आमदार अनिलभाऊंचा मोठेपणा कशात होता, हे जर तुम्ही विचाराल, तर तो ऋतज्ञतेत होता. या भागातील लोकांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला मोठं केलं. नोट आणि व्होट देऊन आमदार केले. माझी जबाबदारी आहे, या भागाला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याची, हा विचार त्यांनी केला.

Advertisement

नुसता विचार केला नाही, तर तो अंमलात आणण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. आशिया खंडातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे ते जनक आहेत. टेंभू योजना हे आमदार अनिलभाऊंनी पाहिलेलं आणि प्रत्यक्षात आणलेलं स्वप्न आहे. राजकारणाच्या चढ-उतारात आमदार अनिलभाऊंनी अनेक विकास कामांच्या बाबतीत कमी-जास्ती प्रयत्न केले असतील. पण टेंभू म्हंटले की तडजोड नाही. हा माझ्या लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. येथील माणूस उभा राहिला पाहिजे, हा विचार घेऊन आमदार अनिलभाऊ आयुष्यभर जगले, लढले आणि आपले स्वप्न त्यांनी सत्यात उतरवले.
टेंभूचे पाणी शिवारात फिरल्यानंतर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच माझ्यासाठी सर्वात मोठा सन्मान असेल, असे अभिमानाने सांगणारे नेतृत्त्व म्हणजे अनिलभाऊ. संस्कारशिल आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारे आपले नेतृत्त्व म्हणजे अनिलभाऊ, कार्यकर्त्याला पाठबळ देणारे नेतृत्त्व म्हणजे अनिलभाऊ. कार्यकर्ता म्हणजे आपले सर्वस्व मानणारे नेतृत्त्व म्हणजे अनिलभाऊ, तत्त्वाचे राजकारण म्हणजे अनिलभाऊ, जनतेची निस्वार्थी सेवा म्हणजे अनिलभाऊ, स्वतःच्या आणि कुटुंबाच्या पलिकडे कार्यकर्त्यांचे कुटूंब जपणारे कुटुंबप्रमुख म्हणजे अनिलभाऊ, जनतेच्या मनातील राजा भगिरथ म्हणजे अनिलभाऊ..! शब्दांच्या पलिकडे ज्यांचे वर्ण करता येत नाही, असे नेतृत्त्व म्हणजे अनिलभाऊ...!

आजचा दिवस उजडायलाच नको होता. मन मानत नाही. नियती इतकी कठोर का झाली. हसत-खेळत आणि सातत्याने कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे भाऊ अचानक असे सर्वांना पोरके करून का म्हणून तुम्ही निघून गेलात? नियतीचा खेळ कोणालाच समजत नाही. पण घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरावेत आणि भाऊ तुम्ही पुन्हा फिरून यावे. एक हाक मारावी आणि लाखो कार्यकर्त्यांनी एकत्र यावे. आज तो दिवस पुन्हा यावा आणि भाऊंचा आवाज कानावर पडावा, असे वाटते. भाऊ, रात्री, मध्यरात्री कार्यकर्त्यांच्या एका फोनवर प्रत्त्युत्तर देणारे तुम्ही, आमची आर्त हाक तुम्हाला ऐकु येत नाही का? भाऊ तुम्ही परत या....!

सुनिल पाटील- माजी चेअरमन, लेंगरे सोसायटी                          शब्दांकन- सचिन भादुले, प्रतिनिधी विटा

Advertisement
Tags :
#tembhu yojanaMLA Anilbhau Babarsangli
Next Article