मिझोराम, महाराष्ट्र संघांचे विजय
वृत्तसंस्था/ नारायणपूर, छत्तीसगड
मिझोरामने झारखंडचा शेवटच्या गट ड मधील साखळी सामन्यात पराभव करून स्वामी विवेकानंद यू-20 पुरुष राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये गटात अग्रस्थान मिळविले. अन्य एका सामन्यात महाराष्ट्रने त्रिपुरावर 2-0 असा विजय मिळविला.
मिझोरामने याआधीच उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले असून त्यांचा हा शेवटचा गट साखळी सामना होता. त्यांनी झारखंडवर 3-1 अशा गोलफरकाने मात केल्याने ते साखळी फेरीत अपराजित राहिले. 12 गुणांसह त्यांनी गट ड मध्ये अग्रस्थान मिळविले. त्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्रने 9 गुणांसह दुसरे, त्रिपुराने 6 गुणांसह तिसरे, झारखंडने 3 गुणांसह चौथे व हिमाचल प्रदेशला एकही गुण मिळविता आलेला नाही.
मिझोरामने चौथ्या मिनिटालाच आघाडी घेतली. पीसी पाझावनाने हा गोल नोंदवला. एल. जॉनने ही आघाडी 11 व्या मिनिटाला हेडरवर गोल नोंदवून वाढविली. एन्गर्थानमावियाने 87 व्या मिनिटाला त्यात आणखी एका गोलाची भर घातली. बिरबल मोहलीने 38 व्या मिनिटाला झारखंडचा एकमेव गोल नोंदवला. मिझोरामच्या बचावातील चुकीचा लाभ घेत त्याने हा गोल केला.
दुसऱ्या एका अटीतटीच्या सामन्यात महाराष्ट्र व त्रिपुरा यांना पूर्वार्धात एकही गोल नोंदवता आला नाही. क्षितिज मारालेने 62 व्या मिनिटाला हा गोल नोंदवला. इशान सरतापेने 94 व्या मिनिटाला शानदार गोल नोंदवत ही आघाडी दुप्पट महाराष्ट्राचा 2-0 असा विजयही निश्चित केला.