दादासाहेब फाळके पुरस्काराने मिथुन चक्रवर्ती सन्मानित
राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने मंगळवारी गौरविण्यात आले. हातात फ्रॅक्चर असताना पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचलेले मिथुन चक्रवर्ती हे भावुक झाल्याचे दिसून आले. आयुष्यात केलेला संघर्ष पाहता त्याची व्याजासह भरपाई देवाने केल्याचे उद्गार मिथुन चक्रवर्ती यांनी यावेळी काढले आहेत.
फाळके पुरस्कार स्वीकारल्यावर मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सभागृहात उपस्थित लोकांना अभिवादन केले. फाळके पुरस्कार मिळणे ही अत्यंत सन्मानाची बाब आहे. मी पूर्वी देशाकडे फार तक्रारी करायचो, आता कुठलीच तक्रार नाही. मी केवळ देवाचे आभार मानू शकतो, असे मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे.
प्रारंभीच्या वर्षांमध्ये पैशांसाठी मी मोठा संघर्ष केला. माझ्याकडे देखभाल करण्यासाठी एक मोठा परिवार होता, परंतु आता काळ बदलला आहे. मी आता अशा गोष्टींविषयी विचार करत नाही. माझ्या सृजनात्मकतेला दर्शविणाऱ्या आणि प्रेक्षक पसंत करणाऱ्या चित्रपटांवर मी लक्ष केंद्रीत करू इच्छितो असे मिथुन यांनी म्हटले आहे.
मिथुन चक्रवर्ती यांनी 1977 मध्ये स्वत:च्या अभिनयाच्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. पहिल्या चित्रपटाद्वारेच राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. मृगया या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमधील प्रवास सुरू केला आणि 1982 मध्ये ‘डिस्को डान्सर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मिथुन लोकप्रिय ठरले. 1993 मध्ये ‘ताहादेर कथा’ चित्रपटासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार पटकाविला होता.
राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यात गुलमोहर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर पटकथालेखक राहुल चित्तेला यांना गुलमोहर चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट म्हणून ‘केजीएफ चॅप्टर 2’ला गौरविण्यात आले. विशाल भारद्वाज यांना ‘फुरसत’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चित्रपट समीक्षक दीपक दुआ यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर ‘ऊंचाई’ चित्रपटासाठी सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री म्हणून नीना गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले.