मितेश, अतितच्या अर्धशतकांनी बडोद्याला सावरले
वृत्तसंस्था/ बडोदा
मितेश पटेल व अतित शेठ यांच्या झुंजार खेळाच्या बळावर बडोदा संघाने रणजी ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात विद्यमान विजेत्या मुंबईविरुद्ध खेळताना पहिल्या दिवशी 6 बाद 241 धावा जमविल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बडोदा संघाच्या सलामीवीरांना शार्दुल ठाकुर व मोहित अवस्थी यांना बाद केल्यानंतर शम्स मुलानी व तनुष कोटियन या अनुभवी स्पिनर्सनी नियंत्रण मिळवित 35 व्या षटकांपर्यंत बडोदाची स्थिती 5 बाद 90 अशी केली. यानंतर मितेश पटेल (159 चेंडूत 86) व अतित शेठ (नाबाद 60) यांनी शानदार फलंदाजी करीत 130 धावांची शतकी भागीदारी करून बडोदाचा डाव सावरला. उपाहाराच्या ठोक्याला कर्णधार कृणाल पंड्या (21) पाचव्या गड्याच्या रूपात बाद झाला. तनुष कोटियनने त्याला बाद केले. बाद होण्यापूर्वी कृणालने मुलानीला दोन षटकार मारले होते.
कोटियनने नंतर शाश्वत रावतलाही (25) बाद केले. शाश्वतने दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यात शानदार शतक नोंदवत आपला ठसा उमटवला होता. मितेशचा मुलानीच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेने झेल टिपून त्याची खेळी संपुष्टात आणले. पहिल्या दिवशी या खेळपट्टीवर चेंडू टर्न होत होता व बाऊन्सही मिळत होता.
संक्षिप्त धावफलक : बडोदा प.डाव 87 षटकांत 6 बाद 241, मितेश पटेल 86, अतित शेठ खेळत आहे 60, मुलानी 2-95, कोटियन 2-53.
गट अ मधील अन्य सामन्यांची स्थिती
1) जम्मू-काश्मिर प.डाव 80 षटकांत 5 बाद 264 (शुभम कथुरिया खेळत आहे 130, शुभम पुनदिर 37, हितेश वळुंज 2-66, वि. महाराष्ट्र.
2) सेनादल प.डाव 90 षटकांत 4 बाद 298 (रवी चौहान 113, रजत पलिवाल खेळत आहे 86, आर्यन बोरा 2-77)