For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर मालिका विजय

06:45 AM Oct 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंडवर मालिका विजय
Advertisement

मिचेल मार्श ‘मालिकावीर-सामनावीर’चा मानकरी

Advertisement

वृत्तसंस्था / माऊंट माँगेनुई (न्यूझीलंड)

ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करून चॅपेल-हॅडली चषकावर आपले नाव कोरले. या मालिकेतील येथे शनिवारी खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात मिचेल मार्शच्या टी-20 प्रकारातील पहिल्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 3 गड्यांनी पराभव केला. या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी दिली. न्यूझीलंडने 20 षटकात 9 बाद 156 धावा जमविल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 18 षटकात 7 बाद 160 धावा जमवित हा सामना आणि मालिका जिंकली.

Advertisement

न्यूझीलंडच्या डावामध्ये सलामीच्या सिफर्टने 35 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 48, कर्णधार ब्रेसवेलने 22 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 26, निश्चामने 18 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 25 तर रॉबिनसनने 10 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. न्यूझीलंडला 15 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे अॅबॉटने 25 धावांत 3 तर हॅजलवूड आणि बार्टलेट यांनी प्रत्येकी 2, झम्पा आणि स्टोईनीस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. न्यूझीलंडच्या डावात 8 षटकार आणि 12 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमविताना 3 गडी गमविले. न्यूझीलंडच्या डावामध्ये 2 षटकांचा खेळ झाला असताना पावसामुळे खेळ काहीवेळ थांबवावा लागला.

प्रत्युत्तरा दाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात सलामीचा फलंदाज आणि कर्णधार मिचेल मार्शने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 52 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 103 धावा झोडपल्या. ओवेनने 1 षटकारासह 14 तर अॅबॉटने 2 चौकारांसह नाबाद 13 धावा जमविल्या. ऑस्ट्रेलियाच्या डावात 9 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडतर्फे निश्चामने 26 धावांत 4 तर डफीने 29 धावांत 2 आणि सिरेसने 45 धावांत 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 62 धावा जमविताना 1 गडी गमविला. ऑस्ट्रेलियाचे अर्धशतक 34 चेंडूत तर शतक 69 चेंडूत आणि दीड शतक 102 चेंडूत फलकावर लागले. ऑस्ट्रेलियाने 10 षटकात 4 बाद 93 धावा जमविल्या होत्या. मिचेल मार्शने 21 चेंडूत 5 षटकार आणि 4 चौकारांसह अर्धशतक तर शतक 50 चेंडूत 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने झळकविले. टी-20 प्रकारातील मिचेल मार्शचे 73 व्या डावातील हे पहिले शतक आहे.

संक्षिप्त धावफलक: न्यूझीलंड 20 षटकात 9 बाद 156 (सिफर्ट 48, ब्रेसवेल 26, रॉबिनसन 13, निश्चाम 25, अवांतर 15, अॅबॉट 3-25, हॅजलवूड व बार्टलेट प्रत्येकी 2 बळी, झम्पा आणि स्टोईनीस प्रत्येकी 1 बळी), ऑस्ट्रेलिया 18 षटकात 7 बाद 160 (मिचेल मार्श नाबाद 103, ओवेन 14, अॅबॉट नाबाद 13, अवांतर 8, निश्चाम 4-26, डफी 2-29, सिरेस 1-45)

Advertisement
Tags :

.