काँग्रेस अधिवेशनासाठी जनतेच्या पैशांचा दुरुपयोग
खासदार जगदीश शेट्टर यांचा आरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी महात्मा गांधीजींनी लढा उभारला. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतीय काँग्रेस विसर्जित करण्यात आली. परंतु सध्याच्या कर्नाटकातील काँग्रेसकडून गांधीजींच्या काँग्रेस अधिवेशनाचा निव्वळ इव्हेंट करण्यात येत आहे. जनतेच्या पैशांचा हा दुरुपयोग असल्याचा घणाघात खासदार जगदीश शेट्टर यांनी केला.
मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना खासदार शेट्टर यांनी, काँग्रेस अधिवेशनाबाबत रितसर निमंत्रण न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 1924 मध्ये महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाच्या शतकपूर्तीसाठी भव्य कार्यक्रम होणे गरजेचे होते. त्याचबरोबर गांधीजींचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील यासाठी एखादे म्युझियम अथवा स्मारक बांधणे गरजेचे होते. परंतु तसे न करता केवळ एक राजकीय कार्यक्रमाचा इव्हेंट केला जात असल्याचा आरोप शेट्टर यांनी केला.
महात्मा गांधीजींसाठी अधिवेशन होत असताना शहरात मोजक्याच ठिकाणी त्यांचे फोटो आहेत. उर्वरित जागेत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांचेच फोटो झळकत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम नेमका महात्मा गांधीजींसाठी आहे की अन्य कोणत्या गांधींसाठी आहे, याचा शोध लावावा लागेल. सरकारी कार्यक्रम असताना खासदार अथवा स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्यात आलेले नाही. केवळ एका कर्मचाऱ्याकडून कार्यालयात कार्यक्रम पत्रिका पाठविण्यात आली आहे. एका राजकीय कार्यक्रमासाठी सरकारी पैसा उधळला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी महानगर अध्यक्षा गीता सुतार, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, धनश्री देसाई यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.