मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा उत्साहात
350 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : मिशन ऑलिंम्पिक संघटना कर्नाटक आयोजित राष्ट्रीय विविध गटातील मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शिरीष गोगटे, धनंजय जाधव, माधव गुंजीकर, सुरेश शिरोले, शिवकुमार सुरपूरमठ, अजित सिद्दण्णवर, दयानंद चौगुले, सौरभ नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व हनुमान मूर्तीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत संपूर्ण देशातून 350 हून अधिक मल्लांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धेत 14, 17, 19 व वरिष्ठ गटातील मुले व पुरुष गटात विविध वजनी विभागात या स्पर्धा घेण्यात आल्या तर मुलींच्या विभागात 14, 17, 19 व वरिष्ठ व विविध वजन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. जवळपास 50 पंचांना या स्पर्धेसाठी पाचारण करण्यात आले आहे. यावेळी अतुल शिरोले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पिंटू पाखरे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय मुरारी यांनी आभार मानले.