मिशन ऑलिम्पिक राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आजपासून
साडेतीनशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
बेळगाव : मिशन ऑलिम्पिक गेम्स संघटना आयोजित राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा मुलामुलींच्या विविध गटात मॅटवरती घेतली जाणार आहे. या स्पर्धेत 350 मल्ल सहभागी होत आहेत. या स्पर्धकांची व पंचांची राहण्याची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. स्पर्धा शनिवार दि. 25 रोजी सायंकाळी 5 वाजता रामनाथ मंगल कार्यालय भाग्यनगर येथे होणार असल्याची माहिती मिशन ऑलिम्पिक गेम संघटनेचे अध्यक्ष अतुल शिरोले यांनी पत्रकार परिषदेत दिली. कन्नड साहित्य भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गंगाधर एम., शिवकुमार सुरपूरमठ, महेश गुंजीकर, चेतन देसाई, दुंडेश मडकनट्टी आदी उपस्थित होते. या स्पर्धेत मुलांच्या 14, 17, 19 वर्षे व वरिष्ठ अशा चार गटात लढती होतील.
मुला, मुलींच्या 14 वर्षाखालील गटात 30, 35, 38, 41, 44, 48, 52, 57 व 62 किलो तर 17 वर्षाखालील गटात 45, 48, 51, 55, 60, 65, 71 किलो., 19 वर्षाखालील गटात 57, 61, 65, 70, 74, 79 व 86 किलो तर वरिष्ठ गटात 57, 61, 65, 70, 74, 80 व 86 किलोवरील गटात होणार आहेत. या स्पर्धेत पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येईल. त्यासाठी देशातील नामवंत पंच उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धा दोन दिवस चालणार असून रविवारी स्पर्धेची सांगता होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पदके, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी अंतिम टप्प्यात आली असून शनिवारी सकाळपासून स्पर्धक बेळगावमध्ये दाखल होतील.