Solapur : पाच महिन्यांपासून बेपत्ता अल्पवयीन बालिका पुण्यातून सुरक्षित ताब्यात
सोलापूर पोलिसांची मोठी कामगिरी
सोलापूर : गेल्या पाच महिन्यापासून बेपत्ता असलेली अल्पवयीन बालिका व आरोपी यांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने जनता वसाहत पर्वती पायथा पुणे येथून ताब्यात घेतले.
याबाबत ४ एप्रिल २०२५ रोजी विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपी सुरज रमेश शिवशरण तसेच अपहृत अल्पवयीन मुलगी यांचा समावेश आहे. या दोघांना शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. पुण्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी हे गेल्या पाच महिन्यापासून बेपत्ता होते. या गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेला आरोपी सुरज रमेश शिवशरण याने कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले होते.
गेल्या पाच महिन्यापासून यातील बालिका व आरोपी यांचा विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील तत्कालीन तपास अंमलदार यांनी शोध घेतला. सदरचा गुन्हा हा पुढील तपासासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे वर्ग करण्यात आला होता. यातील तपास अधिकारी यांनी कौशल्य पूर्वक तपास करून तसेच तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन यातील आरोपी सुरज शिवशरण व अपहृत मुलगी या दोघांना जनता वसाहत पर्वती पायथा पुणे येथून ताब्यात घेतले.
दोघांनाही रविवारी विजापूर नाका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतियोगिता कक्षाचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक हेमंत मंठाळकर, महिला फौजदार अलका शहापुरे, पोलीस नाईक अ. सत्तार पटेल तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड आदींनी केली.