तब्बल सव्वादोन महिन्यांनंतर बेपत्ता लॉरी-चालकाचा शोध
अंकोला तालुक्यातील शिरुर येथील दुर्घटनेनंतर तिसऱ्या टप्प्यात शोधमोहीम
कारवार : अंकोला तालुक्यातील शिरुर येथील दुर्घटनेच्या तब्बल सव्वादोन महिन्यानंतर केरळमधील बेपत्ता झालेली बेंझ लॉरी आणि लॉरीचालक अर्जुन यांचा शोध लावण्यात बुधवारी यश आले. अंकोला तालुक्यातील शिरुर येथे राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वर बृहत आकाराची दरड कोसळण्याची घटना 16 जुलै रोजी घडली होती. त्या दुर्घटनेनंतर अकराजण आणि केरळमधील बेंझ लॉरी बेपत्ता झाली होती. दुर्घटनेनंतर तातडीने युद्धपातळीवर शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. अकरांपैकी 8 व्यक्तींचे मृतदेह हाती लागले होते. तथापि, लॉरीचालक अर्जुन आणि स्थानिक जगन्नाथ नाईक व लोकेश नाईक यांचा शोध लागला नव्हता. दुर्घटनेनंतर पहिल्या टप्प्यातील शोध मोहीम अतिशय गांभीर्याने अत्याधुनिक यंत्रणासह राबवूनही त्या तिघांचा आणि ट्रकचा शोध घेण्यात अपयश आल्याने शोधमोहीम तात्पुरती स्थगित केली होती.
पहिल्या टप्प्यातील मोहीम उणापुरा एक महना राबविण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्यातील शोध मोहिमेवेळीही अपेक्षित यश आले नाही आणि त्या तिघांचा किंवा ट्रकचा शोध लागला नाही. दोन टप्प्यातील अपयशानंतरही कारवार अंकोलाचे आमदार सतीश सैल स्वस्थ बसायला तयार नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील शोध मोहिमेला हात घातला. तिसरी मोहीम 19 सप्टेंबर रोजी हाती घेण्यात आली. त्यासाठी गोव्याहून ड्रेझर यंत्रणा पाचारण करण्यात आली. ड्रेझरसह जेसीबी, हिताची, पाईपलार्नचा वापर करण्यात आला. उडुपीहून ईश्वर मलपे यांच्या नेतृत्वाखाली डायव्हर्स, चालकाला पाचारण करण्यात आले.
एनडीआरएफची आणि स्थानिक पोलीस जिल्हा प्रशासनाची मदत घेऊन हाती घेतलेल्या या मोहिमेवेळी दरड दुर्घटनेनंतर गंगावळी नदीत मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढले गेलेले, नदीपात्रात वाहून गेलेल्या छोट्या-मोठ्या वस्तू सुरुवातीला सापडल्या आणि बुधवारी मोहिमेच्या सहाव्या दिवशी गंगावळी नदीत वाहून गेलेली केरळमधील लॉरी आणि लॉरीत अडकून पडलेला चालक अर्जुन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आमदार सतीश सैल यांच्याबरोबर केरळचे स्थानिक आमदार आणि लॉरीचालक तिसऱ्या टप्प्यातील मोहिमेवर बरीक नजर ठेवून होते. दरड कोसळल्यानंतर नदी गंगावळी ऑपरेशनवर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. अर्जुननंतर आता जगन्नाथ नाईक आणि लोकेश नाईक यांचे मृतदेह हाती लागणार का? याकडे सर्वांचे विशेष करून लोकेश आणि जगन्नाथ यांच्या कुटुंबीयांचे लक्ष लागून राहिले आहे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कारवारचे आमदार सतीश सैल, कारवार जिल्हा प्रशासन आणि शोध मोहिमेत गुंतलेल्या यंत्रणेचे आभार मानले आहेत.