Sangli Breaking: बेपत्ता बालक सापडले 3 दिवसानंतर, पाडळीतील घटना
एका छोट्याशा म्हसोबा मंदिरात खेळत असताना बालक मिळाले
तासगाव : तासगाव तालुक्यातील पाडळी येथून बेपत्ता झालेले अडीच वर्षाचे बालक तीन दिवसानंतर सुखरूप मिळाले. नजीकच असलेल्या एका छोट्याशा म्हसोबा मंदिरात खेळत असताना बालक मिळाले असून सर्वांनी सुटकेचा निविश्वास टाकला आहे.
शंभूराज शशिकांत पाटील (वय अडीच वर्ष, रा. पाडळी) हा शनिवारी आपल्या वडिलांसोबत जनावरे राखण्यासाठी गेला होता. वडील जनावरे दुसऱ्या तुकड्यात बांधण्यासाठी गेले असता शंभूराज झाडाखाली खेळत होता. दरम्यान, पाच वाजता शंभूराज खेळत असलेल्या ठिकाणी आले असता तो मिळून आला नाही.
तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता. पोलिसांच्यासह, आयुष हेल्पलाइनची टीम, रेस्क्यू फोर्सची टीम पाडळी धामणी परिसरात सलग दोन दिवस शोध घेत होते. मात्र तो मिळून आला नव्हता. पाडळी येथून भवानीनगर रोडला एक किलोमीटर अंतरावर असलेल्या संभाजी यशवंत पाटील यांच्या शेतात म्हसोबाच्या छोटे मंदिर आहे.
या मंदिरामध्ये तो खेळत असल्याचे शेतामध्ये फिरावयास गेलेल्या नेताजी सदाशिव पाटील दिसून आले. बेपत्ता झालेला शंभूराज सुखरूप मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. हे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस पथकाने पाडळी येथे धाव घेतली.