Cultural Kolhapur: कोल्हापुरात गाजला मिस गोहरजानचा जलसा
रसिकांनी गोहरजानची गाणी ऐकण्यासाठी पॅलेस थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती
By : मानसिंगराव कुमठेकर
सांगली : गाण्याचं देशातील पहिलं ध्वनिमुद्रण जिच्या नावावर आहे, त्या कोलकत्याच्या सुप्रसिद्ध गायिका मिस गोहरजान यांचा एक जलसा कोल्हापूर येथे 1922 साली झाला. हा जलसा त्याकाळी खूप गाजला. दोन दिवस झालेल्या या जलशाला कोल्हापुरात मोठा प्रतिसाद मिळाला. तत्कालीन रसिकांनी गोहरजानची गाणी ऐकण्यासाठी पॅलेस थिएटरमध्ये मोठी गर्दी केली होती.
10 भाषांमधून 600 अधिक गाणी
मिस गौहर जान ही एक भारतीय गायिका आणि नर्तकी होती. ती दक्षिण आशियातील पहिली गायिका होती जिची गाणी ग्रामोफोन कंपनीने रेकॉर्ड केली होती. तिच्या गाण्यांचे पहिले रेकॉर्डिंग 1902 मध्ये झाले आणि तिच्या गाण्यांमुळेच ग्रामोफोनला भारतात लोकप्रियता मिळाली.
गौहर जान यांनी 1902 ते 1920 दरम्यान बंगाली, हिंदुस्तानी, गुजराती, तमिळ, मराठी, अरबी, पर्शियन, पुश्तो, फ्रेंच आणि इंग्रजी यासह 10 हून अधिक भाषां मध्ये 600 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. गौहर जान यांनी त्यांच्या ठुमरी, दादरा, कजरी, चैती, भजन आणि तराना या संगीताद्वारे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रसार दूरवर केला.
गौहर जान यांचा जन्म 26 जून 1873 रोजी एका ख्रिश्चन कुटुंबात झाला आई व्हिक्टोरिया जन्माने भारतीय होती आणि ती एक प्रशिक्षित नर्तक आणि गायिका होती. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर, तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि तिचे नाव ‘मलका जान’ ठेवले. तिच्या आईसोबत, गौहरचा धर्मही बदलला आणि ती अँजेलिनाहून गौहरजान बनली. कोलकाता येथे गौहरने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकण्यास सुरुवात केली.
ग्रामोफोन रेकॉर्डिंग करणारी पहिली भारतीय
बनारसमध्ये नृत्य आणि संगीताचे कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर, गौहर जानने 1887 मध्ये दरभंगा राजाच्या राजदरबारात आपली प्रतिभा दाखवली आणि संगीतकार म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1902 मध्ये, भारतातील ग्रामोफोन कंपनीचे पहिले एजंट फ्रेडरिक विल्यम यांनी गौहर जान यांना संगीत रेकॉर्ड करणारे पहिले भारतीय कलाकार म्हणून निवडले.
11 नोव्हेंबर 1902 रोजीतिचे गाण्याचे रेकॉर्डिंग झाले. भारतातील हे पहिले रेकॉर्डिंग होते. गौहर जान यांनी 1902 ते 1920 दरम्यान 10 भाषांमध्ये 600 हून अधिक गाणी गायली. अशा या सुप्रसिद्ध गायिकेचा एक जलसा कोल्हापूर येथे 1922 साली झाला. तत्कालीन संगीत विश्वात या जलशाची मोठी चर्चा झाली. कारण गौहर जानचे गायनाचे कार्यक्रम दक्षिण भारतात फारच थोड्या ठिकाणी झाले होते.
तिकिटाचे दर 1 ते 15 रुपये
तारीख 21 आणि 25 डिसेंबर 1922 रोजी रात्री दहा वाजता पॅलेस थिएटरमध्ये मिस गोहरजानचा जलसा झाला. या जलशाचे दरही त्या काळच्या मानाने महागच होते. पंधरा रुपयापासून एक रुपयापर्यंत असे तिच्या जलशाचे तिकिटाचे दर होते. तरीही रसिकांनी या जलशाला मोठी गर्दी केल्याचे तत्कालीन वृत्तांत आहेत. जिच्या ध्वनिमुद्रिकांनी एकेकाळी अखिल हिंदुस्तानच्या रसिकांना भुरळ पाडली होती, त्या गोहर जान यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी कोल्हापूरकरांना त्यादिवशी मिळाली होती.