भारतीय सैनिकांवरून मुइज्जूंकडून दिशाभूल
मालदीवमधील विरोधी पक्षनेते भडकले
वृत्तसंस्था/ माले
मालदीवमध्ये हजारो भारतीय सैनिक उपसिथत असल्याचा दावा अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी केला होता. हा दावा मालदीवचे माजी विदेशमंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी खोडून काढला आहे. देशात कुठलाही विदेशी सशस्त्र सैनिक तैनात नाही. मुइज्जू यांनी यासंबंधी देशाची दिशाभूल केल्याचे शाहिद यांनी म्हटले आहे.
अध्यक्ष मुइज्जू यांचा ‘हजारो भारतीय सैनिक’ मालदीवमध्ये तैनात असल्याचा दावा म्हणजे केवळ निव्वळ खोटारडेपणा होता. मुइज्जू सरकार भारतीय सैनिकांची अचूक संख्या सांगण्यास देखील असमर्थ ठरली आहे. प्रत्यक्षात देशात कुठलाच विदेशी सशस्त्र सैनिक तैनात नाही. याप्रकरणी पारदर्शकता बाळगणे आवश्यक आहे, तरच सत्य समोर येणार असल्याचे मालदीवियन डेमोक्रेटिक पार्टीचे अध्यक्ष अब्दुल्ला शाहिद यांनी म्हटले आहे.
मोहम्मद मुइज्जू हे मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये मालदीवचे अध्यक्ष झाले हेते. मालदीवमध्ये असलेल्या भारतीय सैनिकांचा मुद्दा मुइज्जू यांनी उपस्थित केला होता. आपण सत्तेवर आलो तर भारतीय सैनिकांना देशातून बाहेर काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी लोकांना दिले होते. सद्यकाळात डॉर्नियर 228 सागरी गस्त विमान आणि दोन एचएएल ध्रूव हेलिकॉप्टर्ससोबत जवळपास 70 भारतीय सैनिक मालदीवमध्ये तैनात आहेत.
अध्यक्षपद स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी मुइज्जू यांनी औपचारिक स्वरुपात भारत सरकारला सैनिक मायदेशी परत बोलाविण्याची विनंती केली होती. तर डिसेंबर महिन्यात मुइज्जू यांनी यासंबंधी भारत सरकारसोबत एक करार झाल्याची घोषणा केली होती.