एनएसव्हीबाबत पुरुषांमध्ये गैरसमज
आरोग्य खात्याचे उद्दिष्ट अपूर्ण; निधी वापराविना, जिल्ह्यात मोजक्याच पुरुषांची शस्त्रक्रिया
बेळगाव : लेकसंख्येची बेसुमार वाढ ही देशासमेरील ज्वलंत समस्या आहे. आज आपल्या देशाची लोकसंख्या 140 कोटीहून अधिक असून जगामध्ये भारत लोकसंख्येच्या बाबतीत प्रथम स्थानावर आहे. लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने उपक्रम राबविले असले तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. बेळगाव जिह्याबाबत सांगावयाचे झाल्यास जिह्याची लोकसंख्या जवळपास 50 लाखांपर्यंत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने सुरू केलेल्या पुऊषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोहिमेला पुरुषांनी स्वारस्य न दाखविल्याने मोहीम यशस्वी झालेली नाही. गेल्या वर्षभरात जिह्यात मोजक्याच पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतली आहे. 2024-25 मध्ये जिह्यात 354 शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याने ठेवले होते. मात्र, केवळ 21 जणांनी नॉन स्क्यालपल व्हॅसेक्टमी (एनएसव्ही) करून घेतले आहे.
पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली तर नपुंसकत्व येते, अशक्तपणा येतो या गैरसमजातून पुरुष शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी पुढे येत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आपल्याऐवजी पत्नीची शस्त्रक्रिया करावी, अशी मागणी करणारे पुरुष अधिक असल्याचे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण खात्याकडून जिह्यातील सर्व तालुका स्थळांवर विशेष जागृतीद्वारे पुऊषांच्या एनएसव्हीबाबत माहिती देण्यात येत असली तरी स्वयंप्रेरणेने एकही पुऊष पुढे आलेला नाही. जिह्यात गेल्या मार्चमध्ये 2 व ऑगस्टमध्ये 3 पुरुषांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली आहे. प्रत्येक महिन्यात 2 ते 3 पुरुषच शस्त्रक्रिया करून घेत आहेत. एखाद्या महिन्यात ही संख्या शून्यावर असते. सातत्याने जनजागृती करण्यात येत असली तरी उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे आरोग्य खात्याचे अधिकारी सांगतात.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत (एनआरएचएम) पुरुषांच्या कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेला प्रोत्साहन देण्यासाठी लाखे रुपयांचे अनुदान जिल्हा केंद्रावर राखून ठेवण्यात आले आहे. पुरुषांनी शस्त्रक्रिया करून घेतल्यास 1,100 रुपये, शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन दिलेल्या व्यक्तिला 200 रुपये, शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना 100 रुपये, औषधासाठी 50 रुपये, नर्सना 15 रुपये, साहाय्यकांना 15 रुपये, इतर खर्च 20 रुपये याप्रमाणे 1500 रुपये एका शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून मिळत असतात. पण, येजनेचा लाभ घेण्यास पुरुष पुढे येत नसल्याने योजनेचा निधी वापराविना पडून आहे.
पुरुषांना त्यांच्या पत्नीकडून विरोध
महिलांवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेच्या तुलनेत पुरुषांवर होणारी एनएसव्ही अत्यंत सुलभ आहे. 5 ते 10 मिनिटांत शस्त्रक्रिया पूर्ण होते. ही शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार झालेल्या पुरुषांना त्यांच्या पत्नीकडून विरोध होत असल्याने आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. महिला पुढे येऊन पतीऐवजी आपली शस्त्रक्रिया करावी, असे सांगत असल्याचे डॉक्टर म्हणतात.