मिर्झा इराण लोकमान्य केसरीचा मानकरी
कार्तिक काटे, पार्थ पाटील, हर्षद सदगिर यांचे प्रेक्षणीय विजय : 20 हजारांहून अधिक शौकीन उपस्थित
बेळगाव/येळ्ळूर : येळ्ळूर येथे कलमेश्वर, श्री चांगळेश्वरी व महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त भव्य निकाली आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती मिर्झा इराणने निशांत मांडोलचा गुणांवर पराभव करून लोकमान्य केसरीचा बहुमान पटकाविला. हर्षद सदगिरीने अमिन जम्मुला गुणांवर तर कार्तिक काटेने राजू मलांगाला लपेट डावावर चीत करून उपस्थित 20 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. प्रमुख कुस्ती मिर्झा इराण व निशांत मांडोल यांच्यात लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे सभासद गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, सतीश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला मिर्झाने निशांतला खाली घेत मानेवर घुटणा ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण 130 किलो वजनाच्या निशांतला फिरविणे कठीण झाले. सातव्या मिनिटाला मिर्झाने पायाला चाट मारून निशांतला खाली घेत घिस्सा डावावर फिरविण्याचा प्रयत्न केला. नवव्या मिनिटाला एकेरी पट काढून मिर्झाने निशांतला खाली घेत पाय लावून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण तोही असफल ठरला. तब्बल 28 मिनिटांनंतर ही कुस्ती गुणांवर खेळविण्याचा निर्णय पंचांनी घेतला. त्यानंतर लागलीच मिर्झा इराणने एकेरी पट काढून निशांतचा गुणांवर पराभव केला. लोकमान्य को- ऑप. सोसायटी सभासदांच्या हस्ते इराणला लोकमान्य केसरीचा किताब देऊन गौरविण्यात आले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी हर्षद सदगिर व भारत केसरी अमिन जम्मू यांच्यात कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, प्रमोद पाटील, ग्रा. पं. सदस्य आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत हर्षदने तिसऱ्या मिनिटाला एकेरी पट काढून अमिनवर कब्जा मिळवत मानेवर मजबूत घुटणा ठेवून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण तितक्याच चलाखीने अमिनने यातून सुटका करून घेतली. 10 व्या मिनिटाला पायाला टाच मारून हर्षदने अमिनला खाली घेत पुन्हा घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारून अमिनने त्यातूनही सुटका करून घेतली. ही कुस्ती जवळपास 24 मिनिटे रंगली. शेवटी कुस्ती गुणांवर घेण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर हर्षद सदगिरने एकेरी पट काढून गुण मिळवत विजय मिळविला.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन शिवा महाराष्ट्र व रोहीत हरियाणा यांच्यात आनंद अकनोजी, प्रमोद पाटील, गोविंद टक्केकर, बाजीराव घोरपडे, गोपाळ कुकडोळकर, प्रवीण पाटील व एन. डी. पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झुंजली. पण शेवटी वेळेअभावी बरोबरीत सोडविण्यात आली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती डब्बल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी व युपी केसरी राजू मलांगा यांच्यात बाळू पाटील, भाऊ पाटील, वर्धमान गंगाई, रामचंद्र मन्नोळकर, विनोद पाटील, मारुती पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून पायाची एकलांगी भरवित व तोंडाला नाकपट्टी लावून फिरविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण राजूने त्यातून सुटका करून घेतली. सातव्या मिनिटाला कार्तिकने एकेरी पट काढून राजूला खाली घेत पुन्हा एकलांगी भरण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारून राजू वर येण्याचा प्रयत्न करत असताना कार्तिकने तेथच लपेट मारून लपेट डावावर चारीमुंड्या चीत केले.
पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बशीडोणीने अमित दिल्लीला खालून डंकी डावावर चीत केले. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत सतीश मुंडे जखमी झाल्याने शिवय्या पुजेरीला विजयी घोषित केले. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत शिवा द•ाrने विशाल शेळकेला घिस्यावर पराभूत केले. आठव्या क्रमांकाची कुस्ती प्रकाश इंगळगी व शुभम चव्हाण-पुणे व नवव्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व सौरभ काकडे पुणे या दोन्ही कुस्त्या डाव-प्रतीडावाने झुंजल्या. पण वेळेअभावी बरोबरीत सोडविल्या. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळीने संजू इंगळगीला बॅकथ्रोवर पराभूत केले. पृथ्वीराज पाटीलने संतोष मोटेला एकचाक डावावर पराभूत केले. पवन चिकदीनकोप्पने बिरुदेवला लपेटवर चीत केले. त्याचप्रमाणे कार्तिक इंगळगी, सुनील अथणी, सूरज कडोली, सुनील अथणी, परसु भांदुर गल्ली, हर्ष कंग्राळी, रोहन कडोली, पांडुरंग माने-सांगली, सिद्धार्थ तीर्थकुंडये, भूमीपुत्र मुतगा, प्रणव उचगाव, तुकाराम किणये, वेदांत मासेकर, करण खादरवाडी, पार्थ पाटील, नचिकेत, आदर्श कंग्राळी, राहुल किणये, अर्णव निट्टूर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला.
आकर्षक कुस्तीत कर्नाटक चॅम्पियन पार्थ पाटील-कंग्राळीने प्रवीण पाटील-कुडित्रे याला दुहेरी पटावर अस्मान दाखविले. रोहीत पाटीलने अजिंक्य पाटीलचा एकचाक डावावर पराभव केला. आकर्षक कुस्तीत पार्थ पाटीलने आपल्या प्रतिस्पर्ध्याला मात करून लपेटवर चीत करून गदेचा मानकरी ठरला. कुस्तीचे पंच म्हणून हणमंत गुरव, दौलत कुगजी, बाळाराम पाटील, कृष्णा पाटील, राजाराम गुरव, मारुती घाडी, गणपत बनोशी, पिराजी मुचंडीकर, अतुल शिरोळ, सुरेश अष्टगी, चेतन बुद्धन्नावर, भाऊ पाटील, मारुती तुळजाई, भाऊ मुचंडी, लक्ष्मण बामणे, शिवाजी पाटील आदींनी काम पाहिले. कुस्तीचे समालोचन कृष्णकांत चौगुले व जोतिराम वाजे यांनी कुस्तीच्या शैलीत केले. हणमंत घुले यांनी आपल्या रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.
स्वाती पाटीलचा गौरव
नुकत्याच राजस्थान येथील कोटा येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 59 किलो वजन गटात कडोलीच्या स्वाती राजू पाटीलने अंतिम फेरीत धडक मारत रौप्य पदक पटकाविले. तिच्या या कामगिरीची दखल घेऊन येळ्ळूरच्या महाराष्ट्रात मैदानात मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
वरुणराजाच्या कृपेमुळे मैदान यशस्वी
मागील दोन-तीन दिवसांपासून येळ्ळूर परिसरात वळीव बरसणार अशी शक्यता होती. दरम्यान, गुरुवारी सकाळपासून उष्म्यात वाढ झाली होती. त्यामुळे वळीव पावसाची हजेरी लागणार या विवंचनेत कुस्तीशौकीन होते. दरम्यान, दुपारी पावसाने हजेरीही लावली. त्यामुळे अनेक शौकिनांनी मैदानाकडे पाठ फिरविली. मात्र, सायंकाळी वरुणराजाने हुलकावणी दिल्यामुळे कुस्ती मैदान यशस्वी पार पडले.
निवृत्तीच्या कुस्तीत रोहित गदेचा मानकरी
कंग्राळीचा मल्ल रोहित पाटील याने महाराष्ट्र मैदानात आपली निवृत्तीची शेवटची कुस्ती अजिंक्य पाटील सांगली याला एकचाक डावावर हरवून गदेचा मानकरी ठरला. तो यापुढे पैलवान घडविण्याचे कार्य करणार आहे. त्याला मान्यवरांच्या हस्ते गदेचे बक्षीस देऊन त्याचा खास गौरव करण्यात आला.