For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिर्झाची भूपेंद्रवर मात केवळ गुणांवर

10:04 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
मिर्झाची भूपेंद्रवर मात केवळ गुणांवर
Advertisement

मिर्झा इराण कोरे किताबाचा मानकरी : कुस्ती शौकिनांची लक्षणीय उपस्थिती : काही कुस्त्या बरोबरीत 

Advertisement

चिकोडी/बेळगाव : चिकोडी येथे शिवशक्ती शुगर्स व कुस्ती संघटना आयोजित डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त भव्य आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान झाले. यावेळी प्रमुख कुस्तीत इराणच्या मिर्झाने भूपेंद्र आजनाळा याच्यावर एकेरीपट काढून एकचाकीवर 35 मिनिटात गुण  विजयी गुण मिळविले. त्याने उपस्थित 50 हजारांहून अधिक कुस्तीशौकिनांची मने जिंकत डॉ. प्रभाकर कोरे किताब पटकावला. या मैदानात पृथ्वीराज पाटील व बाला रफीक शेख यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर नेत्रदीपक विजय मिळवून किताब पटकाविले.   प्रमुख कुस्ती रात्री 9.36 वाजता हिंदकेसरी, भारतकेसरी भूपेंद्र आजनाळा व मिर्झा इराण यांच्यात  मल्लिकार्जुन कोरे, जगदीश कवटगीमठ, अस्लम काझी व शिवशक्ती शुगर्सच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. यानंतर पाचव्या मिनाटाला भूपेंद्रने एकेरीपट काढून मिर्झाला खाली घेत चित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मिर्झाने चपळाईने त्यातून सुटका करून घेतली. 15 व्या मिनिटाला मिर्झा इराण याने पायाला टाच मारून भूपेंद्रला खाली घेत बगलडुग मारण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी भूपेंद्रने त्यातून सुटका करून घेतली.

30 मिनिटांनंतरही कुस्तीचा निकाल लागत नसल्याने पंचांनी कुस्ती गुणांवर देण्याचा निर्णय घेतला. 32 व्या मिनिटाला भूपेंद्रने दुहेरीपट काढत मिर्झा इराणला खाली घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, रिमझीम पावसामुळे मिर्झा त्यातून सहीसलामत निसटला. 35 व्या मिनिटाला मिर्झा इराणने आक्रमक चढाई करून एकेरीपट काढून भूपेंद्रला खाली घेत एकचाक डावावर गुण मिळवून डॉ. प्रभाकर कोरे किताबाचा मानकरी ठरला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व हिंदकेसरी आशिष हुडा यांच्यात बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे माजी अध्यक्ष व कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, कर्नाटक केसरी कृष्णा पाटील, हिंदकेसरी संतोष वेताळ आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत सातव्या मिनिटाला किरण भगतने पायाला आकडी लावत आशिष हुडाला खाली घेत घिस्सा डावावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण चपळाईने हुडाने त्यातून सुटका करून घेतली. दहाव्या मिनिटाला आशिष हुडाने दुहेरीपट काढत किरण भगतवर ताबा मिळविला व मानेवर घुटना ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारत किरणने आपली सुटका केली. ही कुस्ती डाव-प्रतिडावाने झाली. वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

Advertisement

तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांमुळे अनेक कुस्त्या बरोबरीत

तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती साखर कारखान्याच्या सभासदांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील व हिमाचल केसरी व उत्तर प्रदेश केसरी पालेंदर मथुरा यांच्यात लावण्यात आली. पृथ्वीराजने दुहेरीपट काढत पालेंदरला खाली घेतले आणि घिस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला.  अनुभवी पालेंदरने त्यातून सुटका करून घेतली. दहाव्या मिनिटाला पृथ्वीराजने एकेरीपट काढून पालेंदरला खाली घेत ढाकेवर चारमुंड्या चित करीत  शौकिनांची थाप मिळविली. चौथ्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी बाला रफीक व बालवीर केसरी जोगेंद्र हरियाणा यांच्यात मल्लिकार्जुन कोरे व जगदीश कवटगीमठ यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत सहाव्या मिनिटाला जोगेंद्रने एकेरीपट काढून बाला रफीकला खाली घेत मानेवर घुटना ठेऊन फिरविण्याचा प्रयत्न करताना खालून डंकी मारत जोगेंद्रला कळत-नकळत चित केले.

पाचव्या क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोठे व राष्ट्रीय पदक विजेता विपीन हरियाणा यांच्यात ज्येष्ठ कुस्तीपटूंकडून लावण्यात आली. ही कुस्ती डाव-प्रतिडावाने रंगली. वेळेअभावी ती बरोबरीत राहिली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व आंतरराष्ट्रीय पदक विजेता सचिन हरियाणा यांच्यात अंकलीगिर कुस्ती संघटनेच्यावतीने लावण्यात आली. दुसऱ्याच मिनिटाला सचिनला एकेरीपट काढून कार्तिकला खाली घेतले. पण कार्तिकने खालून डंकी मारून सचिनवर ताबा मिळवित एकलांगी बांधून चित करण्याचा  प्रयत्न केला. पण नवख्या सचिनने आपल्या चपळाईने एकलांगी सोडवत कार्तिकवर ताबा मिळविला. ही कुस्ती अतिशय रंगतदार झाली. शेवटी ही कुस्तीही बरोबरीत राहिली. सातव्या क्रमांकाची कुस्ती शुभम सिदनाळे व सोनुकुमार हरियाणा यांच्यात रंगली. पण वेळेअभावी ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत कर्नाटक केसरी संगमेश बिराजदारने कुमार केसरी विजेता गुर्जंट पंजाबचा घुटना डावावर प्रेक्षणीय विजय मिळविला. त्याचप्रमाणे बाळू सिंधीकुरबेट, पृथ्वीराज खरात, शिवानंद दड्डी, संतोष हारुगेरी, कुमार मसरगुप्पी, यश कंग्राळी, प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. पार्थ पाटील, हणमंत गंदिगवाड, महेश-तीर्थकुंडये, मुबारक यांच्या कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या.

वाढदिवस 77 वा कुस्त्याही 77

अंकली (ता. चिकोडी) येथे राज्यसभेचे माजी सदस्य केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर लि., हर्मस डिस्टिलरी प्रा. लि. व केएलई शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कुस्ती मैदानात आंतरराष्ट्रीय लढती झाल्या. डॉ. प्रभाकर कोरे यांच्या 77 व्या वाढदिवसानिमित्त या मैदानात मल्लांच्या 77 लढती खेळविण्यात आल्या. या स्पर्धेसाठी महान भारत केसरी, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख, कर्नाटक केसरी, कर्नाटक कंठीरव्वा व अखिल भारत महापौर केसरी विजेता रत्नकुमार मठपती, हिंदकेसरी संतोष वेताळ, कल्लाप्पाअण्णा शिरोळ, शंकर पुजेरी, संजू हारुगेरी, अस्लम काझी, बाळाराम पाटील, कृष्णा पाटील आदींनी पंच म्हणून काम पाहिले. कुस्ती मैदानाचे उद्घाटन विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ, रायबागचे आमदार दुर्योधन ऐहोळे, राष्ट्रीय साखर कारखाना महामंडळ नवी दिल्लीचे संचालक युवा नेते अमित कोरे, विधान परिषद सदस्य व माजी मंत्री प्रकाश हुक्केरी, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना अध्यक्ष मल्लिकार्जुन कोरे, उपाध्यक्ष तात्यासाहेब काटे, संचालक भरतेश बनवन्ने, दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमर यादव, चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक, शिवशक्ती शुगर साखर कारखान्याचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुस्तीचे समालोचन कुस्ती निवेदक धनंजय मदणे- पंढरपूर, गिरीश बळूल - अलगूर, सदाशिव पखाले-कुंभारट्टी यांनी केले. कुरुंदवाडचे नगरसेवक राजू आवळे यांनी आपल्या हलगीच्या बेधुंद तालावर कुस्ती शौकिनांना खिळवून ठेवले.

मनोरंजक कुस्तीत देवा थापाची पुन्हा एकदा रवींद्रवर मात

संपूर्ण भारतात आपल्या कौशल्याने परिचित असलेल्या देवा थापा-नेपाळ व हिमाचलचा रवींद्रकुमार यांच्यात मनोरंजनपर कुस्तीचे आयोजन करण्यात आले. ही कुस्ती मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. कुस्ती शौकीन या कुस्तीची आतुरतेने वाट पाहत होती. मैदानात देवा थापा उपस्थित झाल्यानंतर कुस्तीशौकिनांनी एकच जल्लोष केला. रवींद्रने पायाला टाच मारीत देवाला खाली घेतले. घुटना मानेवर ठेवून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण देवा थापाने खालून डंकी मारत रवींद्रवर ताबा मिळवत त्याला चित केले.

भर पावसातही कुस्तीशौकीन खुश

शारदादेवी कोरे स्कूलच्या पटांगणावर कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. जवळपास 50 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची बसण्याची गॅलरीद्वारे व बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती. चारी बाजूने दिव्यांची व्यवस्था करण्यात आली होती. लांबून कुस्ती पाहण्यास मिळावी, यासाठी दोन स्क्रिनची व्यवस्था केल्याने अनेक कुस्ती शौकिनांनी कुस्तीचा मनमुराद आनंद लुटला. मैदानात सलग फटाक्यांच्या आतषबाजीमुळे जल्लोषी वातावरण निर्माण झाले होते.

Advertisement
Tags :

.