नातेवाईकांशी ओळख वाढवली, भरदिवसा बाळाला घेवून पळाली; घटना CCTV मध्ये कैद
या घटनेनंतर शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर आला
मिरज : येथील मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या प्रसुती विभागातून तीन दिवसाच्या नवजात बालकाची चोरी झाल्याची बाब शनिवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. एका अनोळखी महिलेने रुग्ण महिला व तिच्या नातेवाईकांशी ओखळ वाढवून प्रसुती विभागात बाळाला औषध पाजण्याच्या निमित्ताने बाळ पळवून नेल्याचे सांगण्यात आले. याबाबत तुकाराम तायाप्पा गोरडे यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली आहे.
रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या आधारे बाळ चोरणाऱ्या महिलेचा शोध घेतला जात आहे. या घटनेने शासकीय रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत माहिती अशी, सांगोला (जि. सोलापूर) येथील कविता समाधान अलदर ही महिला प्रसुतीसाठी चार दिवसांपूर्वी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. तिच्यावर सिझरिंग केल्यानंतर मुलगा जन्माला आला. बाळ जन्माला येऊन तीन दिवस झाले होते. संबंधित महिला रुग्णासोबत वडील तुकाराम व आईदेखील होत्या.
याचवेळी प्रसुती विभागात एक अनोळखी महिलाही वावरत होती. सलग दोन दिवस त्या अनोळखी महिलेने ओळख वाढवून विश्वास संपादन केला. शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास कविता अलदर यांचे आई-वडील चहा-नाष्टा करण्यासाठी बाहेर गेले. यावेळी संशयित अनोळखी महिला कविता यांच्याजवळ आली. डॉक्टरांनी वॉर्ड क्र. 16 मध्ये बाळाला औषध पाजण्यासाठी आणण्यास सांगितले आहे, असे म्हणून तिने बाळाला उचलून घेतले.
त्यानंतर कविता यांना कॉटवरच झोपण्यास सांगून ती महिला बाळाला घेऊन गेली. मात्र, बराच उशिरापर्यंत ती बाळाला घेऊन परत आली नाही. काही वेळानंतर कविता यांचे आई-वडील रुग्णालयात आले. कविता यांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर आई-वडिलांनी बाळाची शोधोशोध सुरु केली. 16 नंबर विभागात चौकशी केल्यानंतर तेथे बाळाला औषध पाजण्यासाठी आणलेच नसल्याचे सांगितले.
अनोळखी महिलेने बाळ चोरुन नेल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी गांधी चौकी पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीने महिला पोलिसांना पाचारण करुन चौकशी सुरु केली. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. यामध्ये अनोळखी महिलेचे चित्रण झाल्याचे सांगण्यात आले. दिवसभरात सदर महिला व बाळ सापडले नव्हते. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शासकीय रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेचा फोलपणा चव्हाट्यावर आला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर पाच ते सहा सुरक्षा रक्षक कर्मचारी व तपासणी कर्मचारी असताना बाळ चोरुन ती महिला पसार झालीच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. तसेच संबंधीत महिलेला कोणत्याही कारणाशिवाय प्रसूती विभागात सोडले कसे? असाही सवाल विचारला जात आहे.
स्वत:ची मुलगी उपचारासाठी दाखल असताना तिच्या आई-वडिलांना गेटजवळ थांबवले जात होते. मात्र अनोळखी महिला रुग्णालयात शिरुन बाळाला चोरुन नेईपर्यंत रुग्णालयाची सुरक्षा यंत्रणा झोपली होती का? असा सवाल केला जात आहे. पोलिसांनी सर्व अंगानी तपास सुरु केला आहे.
हलगर्जीपणा केलेल्यांवर कारवाई होणार
"बाळ चोरीस गेल्याची घटना समजल्यानंतर पोलिसात तक्रार दिली आहे. सर्व सीसीटीव्ही तपासले. काही सीसीटीव्हीत महिलेचे चित्रीकरण झाले आहे. त्याच्या आधारे पोलिस तपास करीत आहेत. सुरक्षा रक्षक, नर्स व प्रसुती विभागाच्या प्रमुखांचीही अंतर्गत चौकशी केली जात आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे."
- डॉ. रुपेश शिंदे, उपवैद्यकीय अधिष्ठाता, मिरज सिव्हील