Satara News : साताऱ्यात बसस्थानकात चोरीसाठी अल्पवयीन मुलींचा वापर
सातारा बसस्थानकात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
सातारा : सातारा एस. टी. बसस्थानकात धावपळ आणि गडबडीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने, पर्समधील रोकड व मोबाईल चोरण्यासाठी अल्पवयीन मुलींचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे.
मेढ्यावरून जोतिबा देवदर्शनासाठी निघालेले बाबर कुटुंबीय सातारा बसस्थानकात पोहोचले होते. कोल्हापूरकडे जाणाऱ्या बसची ते वाट पाहत होते. यावेळी पती पत्नी आणि त्यांचा आठ वर्षांचा मुलगा असे तिघेही प्लॅटफॉर्मवर उभे होते.
बसमध्ये जागा मिळावी म्हणून बाबर पुढे धावले. बसमध्ये चढताना त्यांच्या मागे दोन अल्पवयीन मुलीहोत्या. त्यातील एका लहान मुलीने अचानक रडण्याचे नाटक केले. त्यामुळे बाबर यांच्या पत्नीचे लक्ष तिच्याकडे गेले. याच क्षणी दुसऱ्या मुलीने संधी साधत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून तोडले आणि दोघीही 'आमचे घरचे दिसले नाहीत' असा बहाणा करत गर्दीतून पळ काढला. मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीसांकडे धाव घेतली.