मीरा अँड्रीव्हा, जॅक ड्रेपर विजेते
इंडियन वेल्स मास्टर्स स्पर्धा : टॉप सिडेड साबालेंका, रुने उपविजेते
वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया
येथे झालेल्या 2025 च्या टेनिस हंगामातील इंडियन वेल्स मास्टर्स 1000 दर्जाच्या पीएनबी पेरीबस आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत रशियाची नवोदित मीरा अँड्रीव्हा तसेच ब्रिटनचा नवोदित जॅक ड्रेपर यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष एकेरीतील अजिंक्यपदे पटकाविली. रशियाच्या अँड्रीव्हाने बेलारुसच्या टॉप सिडेड साबालेंकाला पराभवाचा धक्का दिला. तर ब्रिटनच्या ड्रेपरने डेन्मार्कच्या रुनेचे आव्हान संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 17 वर्षीय अँड्रीव्हाने टॉप सिडेड आर्यना साबालेंकाचे आव्हान 2-6, 6-4, 6-3 अशा सेट्समध्ये संपुष्टात आणले. अँड्रीव्हाने डब्ल्यूटीए टूरवरील 1000 दर्जाची ही दुसरी स्पर्धा जिंकली आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या इतिहासामध्ये सेरेना विलियम्सनंतर 1999 नंतर महिला एकेरीचे जेतेपद मिळविणारी अँड्रीव्हा ही सर्वात कमी वयाची महिला टेनिसपटू ठरली आहे.
या अंतिम सामन्यात साबालेंकाने पहिला सेट 6-2 असा जिंकून अँड्रीव्हावर आघाडी घेतली होती. या सेटमध्ये अँड्रीव्हाला केवळ दोन गेम्स जिंकता आले. साबालेंकाने या सेटमध्ये दोन वेळा अँड्रीव्हाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर पुढील दोन सेटमध्ये अँड्रीव्हाने आपल्या डावपेचात चांगलाच बदल केला. बेसलाईन खेळावर तसेच क्रॉसहँड फटक्यावर साबालेंकाला वारंवार नेटजवळ खेचल्याने तिच्याकडून चूका होऊ लागल्या. अँड्रीव्हाने दुसरा सेट 6-4 असा जिंकून साबालेंकाशी बरोबरी साधली. या सेटमध्ये अँड्रीव्हाने तीन वेळा साबालेंकाची सर्व्हिस तोडली. तिसऱ्या आणि शेवटच्या सेटमध्ये अँड्रीव्हाच्या वेगवान सर्व्हिसमुळे साबालेंकाची चांगलीच दमछाक झाली. या सेटमध्ये साबालेंकाला केवळ तीन गेम्स जिंकण्याची संधी मिळाली. शेवटी अँड्रीव्हाने फोरहँड फटक्यावर आपला विजय नोंदविला. गेल्या वर्षभराच्या कालावधीपासून अँड्रीव्हाला माजी टेनिसपटू कोंचिता मार्टिनेझचे मार्गदर्शन लाभत आहे. गेल्या वर्षी अँड्रीव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. गेल्या महिन्यात तिने दुबईतील टेनिस स्पर्धा जिंकली होती. अँड्रीव्हाने यापूर्वी दोन वेळेला विजेतेपद मिळविणाऱ्या पोलंडच्या इगा स्वायटेकला उपांत्य फेरीमध्ये पराभूत केले होते. अँड्रीव्हाच्या या जेतेपदामुळे तिचे महिला टेनिसपटूंच्या ताज्या मानांकन यादीत स्थान वधारले असून ती आता पहिल्या 10 टेनिसपटूंमध्ये दाखल होईल.
जॅक ड्रेपर विजेता
पुरुष एकेरीच्या झालेल्या अंतिम सामन्यात सातव्या मानांकित ब्रिटनच्या जॅक ड्रेपरने डेन्मार्कच्या होल्गेर रुनेचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडत पहिल्यांदा या स्पर्धेत एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले. ड्रेपरला या स्पर्धेत 24 तासांच्या कालावधीत दोन सामने खेळावे लागले होते. एटीपी मास्टर्स 1000 दर्जाची स्पर्धा जिंकणारा जॅक ड्रेपर हा ब्रिटनचा पाचवा टेनिसपटू आहे. यापूर्वी टीम हेनमन, ग्रेग रुसेडेस्की, अँडी मरे आणि कॅमेरुन नुरी या ब्रिटीश टेनिसपटूंनी असा विक्रम केला होता. 23 वर्षीय ड्रेपरने रुनेवर एकतर्फी विजय मिळविला. या सामन्यात रुनेला केवळ चार गेम्स जिंकता आले. ड्रेपरने एटीपी टूरवरील आतापर्यंत तीन स्पर्धा जिंकल्या आहेत. यापूर्वी त्याने एटीपी स्टुटगार्ट 250 दर्जाची तसेच व्हिएन्ना एटीपी 500 दर्जाची स्पर्धा जिंकली होती. गेल्या शनिवारी ड्रेपरने या स्पर्धेतील विद्यमान विजेता स्पेनचा कार्लोस अल्कारेझला पराभूत करुन शौकिनांना अनपेक्षित धक्का दिला होता.