जिल्ह्यात ५.२६ कोटींचे लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर
रत्नागिरी :
जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ० ते १०० हेक्टर लघुपाटबंधारे योजनांसाठी १९ कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांसाठी अंदाजे ५ कोटी २६ लाख २२ हजार रुपये निधीची गरज आहे. त्यापैकी ३१७.५४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. उर्वरित २०८.६८ लाख रुपये निधीची अजूनही येणे शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
या योजनेचे उद्दिष्ट व व्याप्तीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पाणी स्रोतांच्या बळकटीकरणासाठी या बंधाऱ्यांच्या कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेतील कामांसाठी २०२३-२४ या वर्षात १९८.५० लाख रुपये व २०२४-२५ या वर्षात ३१७.५४ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेती व बागायतीलाही मोठा फायदा मिळणार आहे. २०२४-२५ या वर्षासाठी तयार केलेल्या या आराखड्यात संगमेश्वर तालुक्यातील ६, लांजा २, रत्नागिरी ६, दापोली २, चिपळूण १ आणि गुहागर तालुक्यातील २ कामांचा समावेश आहे. सर्वाधिक बंधाऱ्यांची कामे रत्नागिरी आणि संगमेश्वर या दोन तालुक्यांमध्ये आहेत. या प्रकल्पांमुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची समस्या कमी होण्यास मदत होईल आणि शेती तसेच बागायतींना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- तालुकानिहाय प्रकल्पांचा तपशील (अंदाजित रक्कम आणि प्राप्त निधी) :
दापोली तालुकाः कांगवई पेडणेकरवाडीतील बंधाऱ्याचे कामः १४.९१ लाख रुपये खर्च. देहेण देपोलकरवाडी येथील बंधाऱ्याचे कामः १४.९६ लाख रुपये खर्च.
संगमेश्वर तालुकाः वाशीतर्फे देवरुख न.पा.पु. योजना विहिरीजवळ बंधारा बांधणेः अंदाजे १४,९९,६२८ रुपये, ९ लाख रुपये प्राप्त. देवळे बाजारपेठ मुख्य वहाळ बंधाऱ्याचे कामः अंदाजे १९,९९,९२५ रुपये; १२ लाख रुपये प्राप्त. मोर्डे बंदर पऱ्या बंधाऱ्याचे कामः अंदाजे १९,९९,९८९ रुपये, १२ लाख रुपये प्राप्त. कनकाडी शिंदेवाडी ब्राह्मणवाडी सार्वजनिक विहिरीजवळ बंधारा बांधणेः अंदाजे १९,९९,९८८ रुपये, १२ लाख रुपये प्राप्त. कनकाडी बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीच्या जवळ बंधाऱ्याचे कामः अंदाजे १९,८२,७०० रुपये, १९ लाख रुपये प्राप्त. कासारकोळवण कांडकरी मंदिर येथे पोस्ता फ्ऱ्या बंधाऱ्याचे कामः अंदाजे १५ लाख रुपये, ९ लाख रुपये प्राप्त.
लांजा तालुकाः निओशी गणेश विसर्जनाजवळ कॉक्रिट बंधाऱ्याचे कामः अंदाजे २०,१६,४२९ रुपये; १२.१० लाख रुपये प्राप्त. पन्हाळे आदिष्टी मंदिर बंधारा बांधणेः अंदाजे २४,९५,१६८ रुपये, १४.१७ लाख रुपये प्राप्त.
रत्नागिरी तालुकाः वेतोशी मधलीवाडी व खालीवाडी लिकाया नदीवर बंधाऱ्याचे कामः अंदाजे ४६.९५ लाख रुपये, २८.१७ लाख रुपये प्राप्त. पानवल सुरंगा पऱ्या येथे बंधाऱ्याचे कामः अंदाजे ४९.९९ लाख रु. ३० लाख रु. प्राप्त. फणसोप जुवीवाडी धरणाजवळ वहाळावरती बंधाऱ्याचे कामः अंदाजे २९.९९ लाख रुपये, १९.७९ लाख रुपये प्राप्त. गोळप मानेवाडी/कातळवाडी न.पा.पु. योजनेच्या विहिरीजवळ नदीवर बंधाऱ्याचे कामः अंदाजे ४८.५४ लाख रु., २९.१३ लाख रुपये प्राप्त. कसोप बनवाडी येथे नवीन बंधारा बांधणेः अंदाजे २९.९९ लाख रु. १८ लाख रु. प्राप्त. धामणसे शिरखोल येथे नदीवर वळण बंधारा व पारपाट बांधणेः अंदाजे ५० लाख रु., ३०.०२ लाख रुपये प्राप्त.
चिपळूण तालुकाः कापसाळ दुकानखोरी येथे नदीवर बंधारा बांधणेः अंदाजे २५ लाख रुपये, १५.०६ लाख रुपये प्राप्त.
गुहागर तालुकाः अहूर नागझरी नळपाणी पुरवठा योजना विहिरीच्या जवळ बंधारा बांधणेः अंदाजे २०.२६ लाख रुपये, १२.१६ लाख रुपये प्राप्त. गिमवी काजळी नदी येथे नदीला बंधारा बांधणेः अंदाजे २०.६२ लाख रुपये, १२.३७ लाख रुपये प्राप्त.