अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करून अत्याचार
पाच जणांना अटक : एपीएमसी पोलिसांची कारवाई : आणखी एक आरोपी फरार
प्रतिनिधी/ बेळगाव
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. एफआयआर दाखल होऊन केवळ 24 तासात संशयितांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील आणखी एका फरारी आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी रविवारी सकाळी पत्रकारांना ही माहिती दिली. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ काढून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला सातत्याने ब्लॅकमेल करण्यात आले. केवळ पंधरवड्यात उघडकीस आलेली ही दुसरी गंभीर घटना आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर 2024 मध्ये काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका डोंगरावर नेऊन पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आले आहेत. एकाने या घटनेचा व्हिडिओ करून घेतला होता. त्यानंतर जानेवारीत पुन्हा त्या अल्पवयीन मुलीशी संपर्क साधून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.
व्हिडिओ जवळ ठेवून सातत्याने तिला
ब्लॅकमेल करण्यात येत होते. शनिवारी एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक संतोष दळवाई व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ 24 तासात दोन अल्पवयीन मुलांसह पाच जणांना अटक केली आहे.
या घटनेने एकच खळबळ माजली आहे. 10 मे रोजी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सावगाव रोडवरील एका फार्महाऊसवर तिघा जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली होती. टिळकवाडी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली होती. हद्दीच्या आधारावरून हे प्रकरण मार्केट पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे. ही गंभीर घटना ताजी असतानाच अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटना उघडकीस आली आहे.
खरेतर काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका निर्जन डोंगरावर ही घटना घडली आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली असली तरी हद्दीच्या आधारावरून हे प्रकरणही काकती पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.