बंगालमध्ये अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या
पोलिसांकडून घटनेकडे दुर्लक्ष झाल्याचा कुटुंबीयांचा आरोप
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील जयनगर येथे 10 वर्षीय मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली आहे. ही मुलगी 4 ऑक्टोबर रोजी ट्यूशनसाठी घरातून बाहेर पडली होती. तेथून परतताना ती बेपत्ता झाली होती. याप्रकरणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली होती. परंतु पोलिसांनी त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले होते.
तर 5 ऑक्टोबर रोजी स्थानिक लोकांना मुलीचा मृतदेह आढळून आला होता. ही मुलगी इयत्ता चौथीची विद्यार्थिनी होती. मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर घटनेच्या विरोधात जमावाने एका पोलीस स्थानकाला पेटवून देत दगडफेक केली आहे.
बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी याप्रकरणी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारकडून वेळीच कारवाई होत नसल्याने बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. पश्चिम बंगाल सरकारने कोलकात्यातील डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे हाताळल्याने राज्यात अशा घटनांना बळ मिळत आहे. बंगालमध्ये हिंसा रोखण्याचे कुठलेच ठोस पाऊल दिसून येत नसल्याचे बोस यांनी म्हटले आहे.
ममता सरकार सुरक्षा करण्यास असमर्थ
कृपाखाली येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत तिची हत्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या राज्यातील महिलांची सुरक्षा करण्यास असमर्थ ठरल्या आहेत. नवरात्रोत्सवादरम्यान देखील बंगालमध्ये मुली सुरक्षित नाहीत. ममता बॅनर्जी यांच्या कुशासनामुळे बंगाली मुलींना ही दुर्दशा सहन करावी लागत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजूमदार केला आहे.