त्या मंत्र्याला मिळाले कर्माचे फळ!
मंत्री आमदारांचे वर्तन चांगले हवे : वीजमंत्री सुदिन ढवळीकरांचा टोला
फोंडा : आमदार, मंत्र्यांचे जनतेशी वर्तन चांगले हवे. पंच, सरपंचाचा त्यांनी आदर करायला हवा. आपल्या बऱ्या वाईट कर्माप्रमाणे फळ हे निश्चितच मिळत असते. वाईट फळाची परिणती अधोगतीमध्येच होते, हे महाभारतामध्ये सांगितले आहे, अशा शब्दांत वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी मंत्रीमंडळातून डच्चू दिलेले प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांचे नाव न घेता प्रतिक्रिया व्यक्त केली. कवळे ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांसमोर पहिल्यांदाच मंत्री ढवळीकर गोविंद गावडे यांच्याविषयी बोलले. रविवारी खांडोळा येथे झालेल्या जाहीर सभेत आमदार गोविंद गावडे यांनी मंत्री सुदिन ढवळीकर यांचा थेट उल्लेख केला होता. स्व. मनोहर पर्रीकर हे आजारी असताना मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा ताबा देण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी आपण ढवळीकरांकडे हे पद सोपविण्यास ठाम विरोध केला होता, असे गोविंद गावडे यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यावर बोलताना मंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, जनतेची इच्छा असल्यास आपण कधीही मुख्यमंत्री होऊ शकतो.
शिवाय तो नशिबाचा भाग आहे. त्यावेळी विजय सरदेसाई, रोहन खंवटे यांच्यासह इतरांनीही विरोध केला होता आणि हे सर्वश्रुत आहे. डच्चू दिलेल्या याच मंत्र्यांने पर्रीकरांच्या कार्यकाळात भर मंत्रिमंडळात अर्वाच्च भाषेत आपला अपमान केला होता. त्यावेळी पर्रीकरांनी कारवाई करण्याची हमी दिली होती. पण त्यावेळी कारवाई काही झाली नाही, उशिरा का होईना पण आज त्या कर्माचे फळ मिळाले आहे, असे आपल्याला वाटते. चांगले कर्म केल्यास त्याचे चांगलेच फळ मिळणार, वाईट कर्मामुळे अधोगती ठरलेली आहे, असा पुनरुच्चार ढवळीकर यांनी केला. मंत्री गोविंद गावडे यांना गच्छंती दिल्याने मगो पक्षाचे बळ प्रियोळात वाढले आहे का ? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, मगो पक्ष हा जनमानसात ऊजलेला पक्ष आहे. प्रियोळच नव्हे तर संपूर्ण गोव्यात त्याला कमीअधिक प्रमाणात पाठिंबा आहे. दाबोळीसारख्या मतदारसंघात मगोचे पाच हजार मतदार आहेत. आमची भाजपाशी युती कायम राहणार आणि मगो पक्षाचे कार्यही सुऊच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.