‘केळ्यां’ना घाबरणाऱ्या मंत्रिणबाई
साऱ्या जगात सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वाधिक खपणारे फळ कोणते असेल तर ते ‘केळे’ हेच आहे. ज्याने एकदाही केळे खाल्लेले नाही, असा माणूस विरळाच मानावा लागेल. केळे हे अत्यंत पौष्टिक, सत्वयुक्त आणि शरीरासाठी लाभदायक (मधुमेही वगळता इतर सर्वांसाठी) असल्याचे वैद्यकीय शास्त्रही म्हणते. अशा या बहुगुणी, निरुपद्रवी आणि त्यामानाने स्वस्त असणाऱ्या फळाला एखादी व्यक्ती घाबरते, असे आपल्याला समजले तर ते खरे वाटण्याची शक्यता कमी आहे.
पण केळ्याला घाबरणारी एक व्यक्ती आहे. ही सामान्य, साधीसुधी व्यक्ती नसून एका देशाची महिला मंत्री आहे. हा देशही साधासुधा नसून चांगलाच परिचित आणि अत्यंत आधुनिक आणि प्रगत असा आहे. या देशाचे नाव आहे स्वीडन आणि या मंत्रिणबाईंची नाव आहे पॉलिना ब्रँडबर्ग. या मंत्रिणबाईंना केळ्याची प्रचंड भीती वाटते. केळे खाणे तर सोडाच, पण ते नुसते दिसले, तरी त्यांचा थरकाप होतो. त्यांच्या घशाला कोरड पडते. हातपाय कापू लागतात आणि त्यांना अतिशय अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे त्या कोठेही गेल्या आणि तेथे टेबलवर किंवा आसपास केळी ठेवलेली असतील, तर ती तेथून हटवावी लागतात.
या मंत्रिणबाईंना केळ्यांसंबंधी पूर्वी असा तिटकारा नव्हता. अलिकडच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या मनात ही भीती निर्माण झाली आहे. हा एक मानसिक विकार असून त्याला ‘बनानाफोबिया’ असे नाव आहे. हा विकार पन्नास लाख लोकांमधून एखाद्याला असू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. याचाच अर्थ असा की जगात अशा साधारत: 2 हजार व्यक्ती आहेत, की ज्या या विकाराने ग्रस्त आहेत. पॉलिना ब्रँडबर्ग या त्यांच्यापैकी एक आहेत. या विकाराचे कारण आजही अज्ञात आहे. ब्रँडबर्ग यांनी 2020 मध्येच आपल्या या विकारासंबंधी इंटरनेटवर माहिती प्रसारित केली होती. मात्र, नंतर ही पोस्ट डिलीट करण्यात आली होती. साऱ्यांना त्यांच्या या स्थितीचे आश्चर्य वाटते पण मंत्रिणबाईंचाही निरुपाय आहे. त्यांनी या विकारावर डॉक्टरांशी विचारविमर्श केला असून त्या उपचारही घेत आहेत. तथापि, हा विकार सहजगत्या नाहीसा होत नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.