मंत्री शंभूराज देसाईंनी ग्रामदेवीच्या यात्रेत धरला ठेका
नवारस्ता :
राज्याचे पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई सर्वसामान्य जनतेशी नाळ ठेवणारे नेते आहेत. त्यांचा बिनधास्तपणाही अनेकदा पहायला मिळतो. शुक्रवारी पाटण तालुक्यातील मरळी येथील त्यांच्या ग्रामदेवतेच्या यात्रेदिवशी मंत्री देसाई व त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी मनसोक्तपणे गुलालाची उधळण करत गाण्याच्या तालाबर ठेका धरला.
मरळीच्या निनाईदेवीची यात्रा उत्साहात पार पडली. यावेळी गावच्या यात्रेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब उपस्थिती लावली. यावेळी गावातील त्यांच्या घरासमोर पालखी येताच शंभूराज देसाई यांनी सहकुटुंब ग्रामदेवता निनाईदेवीचे दर्शन घेतले. तसेच गुलालाची उधळण केली. त्यानंतर ग्रामस्थांसोबत पालखीसमोर जाऊन मंत्री देसाई यांनी गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांचे सुपुत्र तथा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनीही गुलालाची उधळण करत ठेका धरला. मरळी येथील मंत्री देसाई यांच्या निवासस्थानासमोर देवीची पालखी येताच ग्रामस्थांनीही मंत्री देसाई यांना उचलून डोक्यावर घेतले. त्यांच्यासोबत गाण्यावर ठेका धरला .
- व्यस्त शेड्युलमधूनही गावासाठी वेळ
नुकताच राज्याचा अर्थसंकल्प झाला. मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांना सडेतोडपणे उत्तरे देऊन राज्य, जिल्हा आणि आपल्या पाटण मतदारसंघासाठी विविध महत्वपूर्ण योजना मंजूर करून राज्याच्या विकासाचा वाढता आलेख ठेवण्यात यश मिळवले आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री देसाई व्यस्त आहेत. मात्र आपल्या ग्रामदेवतेच्या यात्रेचा कधी त्यांना विसर पडला नाही. याही वर्षी त्यांनी सहकुटुंब उपस्थित राहून गावासाठीही वेळ दिला. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव यात्रेत ठेकाही धरला.