Satara News : साताऱ्यात मादी बिबट्याची शिकार
साताऱ्यात बिबट्याची निर्घृण शिकार
सातारा : सातारा तालुक्यातील मत्त्यापूर येथील बरड शिवारात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रगतशील शेतकरी रविंद्र आबाजी घोरपडे यांच्या उसाच्या शेतात चारही पाय तोडलेल्या मादी बिबट्याचा मृतदेहआढळला. या बिबट्याची शिकार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, या बिबट्याचे शवविच्छेदन झाले असून त्याचे अवयवतपासणीसाठी लॅबला पाठवण्यात आले आहेत. ते आल्यानंतर याबाबत अधिक माहिती मिळेल.या बिबट्याचा मृत्यू अंदाजे तीन ते चार दिवसांपूर्वी झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
घोरपडे यांच्या शेतात गेल्या चार दिवसांपासून ऊसतोडीचे काम सुरू होते. शुक्रवारी, दि. १२ रोजी सकाळी कामगार ऊस तोडत असताना शेताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या दाट व निसरड्या भागात त्यांना बिबट्याचा मृतदेह दिसून आला. अचानक समोर आलेल्या या दृश्यामुळे कामगार घाबरून गेले आणि त्यांनी तत्काळ ही माहिती शेतमालकाला दिली.
घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल संदीप जोपळे व वनकर्मचारी अभिजित कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले असून संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात आली.
मृत्यूभोवती अनेक प्रश्नचिन्हे
तपासादरम्यान सदर बिबट्या मादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिचे चारही पाय पंज्यापासून कापण्यात आले असून सर्व मिळून तब्बल १८ नखे गायब आहेत. मात्र तिच्या मिशा व सर्व दात सुस्थितीत असल्याचे आढळून आले आहे. पुढील तपास सुरू आहे.