मंत्री सतीश जारकीहोळींनी घेतली कुमारस्वामी, देवेगौडांची भेट
नवी दिल्लीत निजदश्रेष्ठींची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
बेंगळूर : नवी दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बुधवारी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त होत आहे. राज्यातील हनिट्रॅप प्रकरणासंबंधी हायकमांडकडे तक्रार देण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी सोमवारी नवी दिल्लीला गेले होते. सोमवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल तर मंगळवारी रणदीप सुरजेवाला यांच्याकडे त्यांनी तक्रार दिली होती. बुधवारी त्यांनी विकासकामांच्या मुद्द्यावर चर्चा करण्याच्या निमित्ताने निजदच्या दोन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
हनिटॅप प्रकरणाला काही प्रभावी नेतेच कारणीभूत असल्याची तक्रार सतीश जारकीहोळी यांनी वरिष्ठांकडे केली होती. त्यापाठोपाठ त्यांनी एच. डी. देवेगौडा आणि एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेतल्याने राजकीयदृष्ट्या तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. तथापि, या भेटीविषयी मंत्री जारकीहोळी यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. राज्यातील शिराडी घाटातील भुयारी मार्ग निर्माण करण्यासंबंधी केंद्र सरकारवर दबाव आणावा. शक्य तितक्या लवकर काम हाती घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करा, अशी विनंती करण्यासाठी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कुमारस्वामी व देवेगौडा यांची भेट घेतल्याचे जारकीहोळींच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.
बेंगळूर-मंगळूर महामार्गावर शिराडी घाटात भुयारी मार्ग निर्माण करण्याची योजना आहे. मंगळवारी सतीश जारकीहोळी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राज्याचे ना हरकत प्रमाणपत्र दिले. त्यानंतर बुधवारी संसद भवनमधील कुमारस्वामी यांच्या कार्यालयात देवेगौडा व कुमारस्वामी यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांनी चर्चा केली. राज्यातील केंद्रीय मंत्र्यांसमवेत गडकरींची भेट घेऊन शिराडी घाटातील भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरु करण्यासंबंधी विनंती करण्याबाबत चर्चा झाल्याचे समजते.