मंत्री नितेश राणे यांनी राजीनामा द्यावा
युवा सेनेच्या वतीने पोलिसांना निवेदन
कणकवली / प्रतिनिधी
मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे समाजा-समाजा मध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. तसेच त्यांनी पुन्हा अशी वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरून त्यांचा राजीनामा मागावा लागेल असे युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी म्हटले आहे. याबाबतचे निवेदन पोलिसांना देण्यात आले. यात म्हटले आहे की, मंत्री नितेश राणे हे वारंवार हिंदू-मुस्लिम समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करत असतात. नितेश राणे हे स्वतःच्या फायद्यासाठी अशी समाजामध्ये वाद निर्माण करणारी वक्तव्य करीत आहेत. आपले मंत्री पद टिकण्यासाठी व आपल्या वरिष्टाना खुश करण्यासाठी वक्तव्य करत असल्यामुळे राज्यातील युवक भडकले जातील व हेच युवक कुठेतरी विनाशकारी मार्गाकडे वळतील. याचा विचार नितेश राणेंना नाही का? अशी असंवेदनशील वक्तव्य करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या रोजगाराचा, युवकांची वाढत चाललेली बेकारी याबद्दल मंत्री राणे हे कधी बोलत नाहीत. पण समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य कायम करत असतात. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तरुण बेरोजगार, ठेकेदार यांची देणीबाकी आहेत जे राज्यसरकार द्यायचे आहे, त्याबद्दल राणे कधीच बोलताना दिसून येत नाहीत. राज्यातील युवकांची बेरोजगारी, महिलांची सुरक्षितता यावर नितेश राणे कधी भाष्य करताना दिसून येत नाहीत. यावरून नितेश राणे यांना शांत असलेले राज्य हे अशांततेच्या मार्गांवर घेऊन जायचे आहे काय असा प्रश्न उपस्थित होतो. अशी वक्तव्य करून दंगली घडवण्याच्या यांचा उद्देश असेल तर अश्या मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने कणकवली पोलीस प्रशासनास करण्यात आली. पोलीस प्रशासनाने ही मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवावी असे यात म्हटले आहे. यावेळी युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, गुरु पेडणेकर, विलास गुडेकर, धीरज मेस्त्री, मंगेश राणे, अविनाश सावंत, आशिष मेस्त्री, चेतन गुरव उपस्थित होते.