दिल्लीत मंत्री कैलाश गेहलोत यांची ‘आप’ला सोडचिठ्ठी
केजरीवालांवर निशाणा : भाजपमध्ये प्रवेश : केंद्राशी लढण्यात वेळ वाया घालवल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. कैलाश गेहलोत यांनी रविवारी सकाळी आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहून राजीनामा जाहीर केला. गेहलोत यांनी केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात यमुना स्वच्छतेच्या मुद्यावरून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. केंद्र सरकारशी लढण्यात आम आदमी पक्षाचा बराच वेळ वाया गेला. पक्षाने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा हल्लाबोल त्यांनी चढवला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांनी गेहलोत यांचा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच हे भाजपचे षड्यंत्र असल्याची टीकाही त्यांनी केली. दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुका ईडी आणि सीबीआयच्या बळावर भाजपला जिंकायच्या आहेत, असे मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या. दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी वॉशिंग मशीन सक्रिय झाली आहेत. आता या मशीनच्या माध्यमातून अनेक नेत्यांचा भाजपमध्ये समावेश होणार असल्याचे आप नेते संजय सिंह म्हणाले.
कैलाश गेहलोत यांनी 2015 मध्ये आम आदमी पार्टीत प्रवेश केला होता. 2017 मध्ये ते पॅबिनेट मंत्री झाले. पेशाने वकील असलेल्या कैलाश गेहलोत यांनी राजकारणात येण्यापूर्वी 10 वर्षे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात अनेक मोठे खटले लढवले होते. अलिकडेच तुऊंगातून सुटल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर कैलाश गेहलोत यांचेही नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. मात्र, पक्षाने आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवल्यामुळे ते नाराज होते. दिल्लीतील मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्याशिवाय कैलाश गेहलोत यांचेही नाव पुढे आले होते. त्यांचीही ईडीने चौकशी केली आहे. तसेच ते प्राप्तिकर विभागाच्या निशाण्यावरही होते. करचुकवेगिरी प्रकरणात त्यांच्याशी जोडलेल्या जागेचीही झडती घेण्यात आली होती.
‘आप’पासून वेगळे होणे हाच एकमेव पर्याय : गेहलोत
मी माझा राजकीय प्रवास दिल्लीच्या लोकांची सेवा करण्याच्या वचनबद्धतेने सुरू केला आणि मला तो पुढेही ठेवायचा आहे. त्यामुळे माझ्याकडे ‘आप’पासून फारकत घेण्याशिवाय आणि आम आदमी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय नाही, असे गेहलोत यांनी आपल्या राजीनामापत्रात नमूद केल्याचे समजते.
तिरंगा वादामुळे प्रसिद्धीच्या झोतात
दिल्लीत स्वातंत्र्यदिनी ध्वज फडकावण्यावरून झालेल्या वादानंतर गेहलोत चर्चेत आले. आपल्याऐवजी आतिशी यांनी झेंडा फडकावावा अशी केजरीवाल यांची इच्छा होती. तर उपराज्यपालांनी कैलाश गेहलोत यांची निवड केली होती. याचदरम्यान कैलाश गेहलोत यांनी केजरीवाल यांचे ‘आधुनिक स्वातंत्र्यसैनिक’ असे भावनिक वर्णन केले. गेहलोत यांचे उपराज्यपालांशीही चांगले संबंध होते. त्यांच्या मंत्रालयाची फाईल राजभवनात कधीच अडकली नाही.