For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ashadhi Wari 2025: श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी करताना मंत्री गोरे म्हणाले...

04:34 PM Jun 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
ashadhi wari 2025  श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पहाणी करताना मंत्री गोरे म्हणाले
Advertisement

पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्या

Advertisement

सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची संख्या मोठी असणार आहेत. वारकऱ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सूक्ष्म नियोजन करावे. वारकऱ्यांच्या सोयी सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी बरड, फलटण, तरडगाव, लोणंद, निरा दत्त घाट पालखी तळांची पहाणी केली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या पहाणी प्रसंगी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, उपायुक्त तुषार ठोंबरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

सध्या पालखी मार्गावर पाऊस पडत आहे, या पावसापासून वारक्रयांचा बचाव व्हावा यासाठी दहा हजार क्षमतेचे वारकरी सेवा केंद्राची उभारणी करावी अशा सूचना करून ग्रामविकास मंत्री श्री. गोरे म्हणाले, वारकऱ्यांसाठी मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. पुरेशा प्रमाणात मोबाईल स्वच्छतागृहांची उपलब्ध करुन द्यावेत. जसजशी पालखी पुढच्या गावात जाईल तशी मागची गावे जिल्हा परिषदेने स्वच्छ करावीत.

विद्युत वितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी. पालखी तळावर हायमास्क दिवे लावावे. तसेच बेकायदा वीज कनेक्शन घेतले जावू नयेत यासाठी पोलीस व विद्युत वितरण कंपनीने पथक तयार करुन बेकायदा कनेक्शन कट करुन टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावेत.

आरोग्य विभागाने पालखी मार्गात वैद्यकीय पथक तैनात करावेत. तसेच वारकऱ्यांसाठी गॅस व केरोसीन पुरविण्यात यावे. अन्न व औषध प्रशासनानेही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावे. वेळोवेळी वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पाण्याची तपासणी करावी. ज्या ठिकाणी रस्त्यांची कामे सुरु आहेत ती कामे ताडीने पूर्ण करावीत त्याचबरोबर जी कामे पूर्ण होणार नाहीत त्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.

पालखी सोहळ्याला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस यंत्रणेने पालखी मार्गावर गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा उपयोग करावा. आवश्यक तेथे निरीक्षण मनोरे उभे करावेत. चोरींच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणेने आवश्यक ते मनुष्यबळ पुरवावे. पार्किंगची व्यवस्था पुरेशी असेल याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी केल्या.

Advertisement
Tags :

.