म्हैसूर मुक्त विद्यापीठाची मानद पदवी मंत्री जारकीहोळींनी नाकारली
बेळगाव : म्हैसूर मानसगंगोत्री कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाने दिलेली मानद डॉक्टरेट पदवी आपण अस्वीकृत करीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. मंत्री जारकीहोळी यांनी यासंबंधी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्नाटक राज्य मुक्त विद्यापीठाच्या कुलपती व तत्सम वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापन मंडळाने संयुक्तपणे 27 मार्च 2025 रोजी आपणाला मानद डॉक्टरेट डी. लिट. पदवी देऊन सन्मान केला. याबद्दल या सर्वांचा मी मनपूर्वक आभारी आहे. ही पदवी देऊन विद्यापीठाने मला समाजाची अधिक जबाबदारी सोपविली. सामाजिक सेवेत मी घेतलेले काही निर्णय यशस्वी करण्यासाठी काही योजना आखल्या आहेत. मात्र त्या कार्यरुपात आणणे माझी जबाबदारी असून त्या कार्यरुपात आणण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने मला दिलेली सन्मानपूर्वक पदवी विद्यापीठाने मागे घ्यावी. माझा हा निर्णय स्वेच्छेने घेतला असून आपण माझ्या निर्णयाचे स्वागत कराल, अशी आशा आहे, असे मंत्री जारकीहोळी यांनी म्हटले आहे.