मंत्री जारकीहोळींनी नवी दिल्लीत घेतली वरिष्ठांची भेट
हनिट्रॅप प्रकरणाविषयी दिली तक्रार
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशभरात खळबळ उडवून दिलेल्या राज्यातील हनिट्रॅप प्रकरणासंबंधी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी राज्यातील प्रभावी काँग्रेस नेत्यांविरोधात हायकमांडकडे तक्रार दिली आहे. राज्यात सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांना हनिट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला होता. या विषयावरुन राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. राजण्णा यांनी विधानसभेतच हनिट्रॅप प्रकरणाचा गौप्यस्फोट केला होता. या प्रकरणामागे काँग्रेसच्या प्रभावी नेत्याचा हात असल्याचा आरोप विरोधी नेत्यांकडून झाला आहे. या प्रकरणामुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते संतप्त झाले असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सोमवारी नवी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. एआयसीसीचे मुख्य सचिव के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेत्यांची भेट घेऊन हनिट्रॅप प्रकरणाची माहिती दिली. या प्रकरणामागे राज्यातील प्रभावी नेता असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिले. मंगळवारी देखील त्यांनी रणदीप सुरजेवाला यांची भेट घेऊन हनिट्रॅप प्रकरणासंबंधी माहिती देत कारवाईची मागणी केल्याचे समजते.
हनिट्रॅप प्रकरण उजेडात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय गटातील मंत्री डॉ. जी. परमेश्वर, के. एन. राजण्णा, डॉ. एच. सी. महादेवप्पा, सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व नेत्यांनी एकत्रितपणे दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र निर्णयात बदल करुन स्वतंत्रपणे वरिष्ठांची भेट घ्यावी, या निर्णयावर ते पोहोचले. त्यामुळेच मंत्री सतीश जारकीहोळी सोमवारी दिल्लीला गेले.