शिंदोळीतील पुजेरी कुटुंबीयांचे मंत्री हेब्बाळकरांकडून सांत्वन
चौकशी करण्याची मंत्री हेब्बाळकर यांची सूचना
बेळगाव : शिंदोळी, ता. बेळगाव येथील मसणाई देवी मंदिरातील चोरीच्या वेळी चोरट्यांनी विहिरीत ढकलून खून केलेल्या महिलेच्या निवासस्थानी रविवारी महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भेट दिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले. गुरुवार दि. 26 सप्टेंबर रोजी पहाटे चोरट्यांनी विहिरीत ढकलल्यामुळे किंवा चोरट्यांच्या तावडीतून स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात विहिरीत पडून मृत्युमुखी झालेल्या भारती कानप्पा पुजेरी (वय 48) या महिलेच्या कुटुंबीयांचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांत्वन केले. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांनी स्थानिक नागरिकांकडून या घटनेसंबंधी माहिती घेतली. चोरी करताना भारतीने पाहिल्यामुळे चोरट्यांनी तिला विहिरीत ढकलल्याचा संशय गावकऱ्यांनी बोलून दाखवला. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी तीव्र करण्याची सूचना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केली.