मंत्री गोयल लवकरच उद्योगपती मस्क यांच्या भेटीला
टेस्लाच्या भारत प्रवेशावर चर्चा शक्य : भारतात कारखाना सुरु करण्याच्या तयारीत कंपनी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल पुढील आठवड्यात अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांची भेट घेऊ शकतात. या बैठकीत इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी ‘टेस्ला’च्या भारतात प्रवेशाबाबत चर्चा होऊ शकते. वृत्तसंस्था रॉयटर्सने सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे की, मस्क आणि गोयल यांच्यात अमेरिकेत होणाऱ्या बैठकीचा केंद्रबिंदू भारतात कारखाना सुरू करण्याची टेस्लाची योजना असणार आहे. यासोबतच भारतात चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करण्यावरही चर्चा होऊ शकते. अहवालात असेही म्हटले आहे की भारतात बनवल्या जाणाऱ्या नवीन धोरणावर देखील बैठकीत चर्चा केली जाऊ शकते. भारतातच इलेक्ट्रिक कार्स बनवणाऱ्या टेस्लाला करात सवलत मिळण्याची शक्यता सांगितली जात आहे. मस्कला भारतात कार निर्मिती आणि बॅटरी साठवण्याचा कारखाना सुरू करायचा आहे. एलॉन मस्कची ईव्ही उत्पादक कंपनी टेस्लाला भारतात इलेक्ट्रिक कारसह बॅटरी स्टोरेज सिस्टीम निर्मितीसह विकायची आहे. यासाठी कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे.
सरकार जानेवारी 2024 पर्यंत मान्यता देऊ शकते
अलीकडेच अशी बातमी आली होती की सरकार भारतात उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी जानेवारी 2024 पर्यंत सर्व आवश्यक मंजुरी देऊ शकते. यासाठी शासकीय विभाग वेगाने काम करत आहे. सोमवारी पंतप्रधान कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही माहिती समोर आली, ज्यामध्ये टेस्लाच्या गुंतवणूक प्रस्तावासह देशातील इलेक्ट्रिक वाहन निर्मितीच्या पुढील टप्प्यावर चर्चा करण्यात आली.