For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री गोविंद गावडे यांची अखेर हकालपट्टी

12:53 PM Jun 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
मंत्री गोविंद गावडे यांची अखेर हकालपट्टी
Advertisement

मुख्यमंत्र्यांची राजीनामा देण्याची सूचना नाही पाळली : मुख्यमंत्र्यांविरुद्ध केलेली जाहीर टीका भोवली : दामू नाईक यांनी घेतली कडक भूमिका

Advertisement

पणजी : वादग्रस्त मंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर बेफाम आरोप करणारे कला व संस्कृती खात्याचे मंत्री, तसेच कला अकादमीचे चेअरमन गोविंद गावडे यांची अखेर काल बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. मुख्यमंत्र्यांनी मंत्री गावडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी आदेश पाळला नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याची सूचना राज्यपालांना केली आहे. प्रदेश भाजपचे अध्यक्ष दामू नाईक यांनी याकामी कडक महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दामू नाईक यांनी गोमंतकीय जनतेला दिलेला शब्द खरा करून दाखवला आहे.

नेहमीच वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले क्रीडा तसेच कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी 25 मे 2025 रोजी फोंडा येथे प्रेरणा दिवस कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांवर प्रखर टीका केली, त्यातून संपूर्ण गोवाभर तीव्र पडसाद उमटले. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी कोणत्याही परिस्थितीत आपण गप्प बसणार नाही, असे जाहीर करुन मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई ही होणारच, असे सांगितले होते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणी फारसे भाष्य केले नव्हते, परंतु प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी मात्र कोणत्याही परिस्थितीत कारवाई केली जाईलच, केवळ त्यासाठी काही दिवस लागतील. एवढेच सूचक भाष्य केले होते .

Advertisement

बदनामी करणाऱ्या मंत्र्याला हटवा

अलीकडेच काही दिवसांपूर्वी भाजपचे वरिष्ठ ज्येष्ठ नेते बी. एल. संतोष हे गोव्यात आले होते. त्यावेळी दामू नाईक आणि त्यांच्यामध्ये मंत्री गावडे प्रकरणी बराच वेळ चर्चा झाली. चर्चेच्यावेळी दामू नाईक यांनी आणखी काही कागदपत्रे तसेच वर्तमानपत्रे संतोष यांना सादर केले. ज्या व्यक्तीमुळे गोवा सरकारची मोठ्या प्रमाणात बदनामी होते अशा व्यक्तीला मंत्रिमंडळात ठेवले जाऊ नये, अशी शिफारस देखील त्यांनी संतोष यांच्याकडे केली होती.

संतोष यांची प्रदेशाध्यक्षांशी चर्चा

नाईक व संतोष यांच्यातील भेटीच्या दुसऱ्या दिवशी संतोष हे गोव्यातून नवी दिल्लीला जाण्यापूर्वी पुन्हा एकदा दामू नाईक यांच्याशी बोलले. नवी दिल्लीहून तुम्हाला कळविले जाईल, असे त्यांनी नाईक यांना सांगितले.

 ती सभा बरीच पडली महागात

मंत्री गोविंद गावडे यांनी 25 मे 2025 रोजी फोंडा येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली होती. एवढे करूनही ते राहिले नाहीत, तर श्रमशक्ती भवनाच्या खाली कंत्राटदारांना बोलावून त्यांच्याकडून काहीतरी घेऊन नंतर त्यांच्या फाइल्स हातावेगळ्या केल्या जातात, असा गंभीर आरोप कोणाचेही नाव न घेता केला होता. हे सरकार भ्रष्ट आहे, अशा पद्धतीचे निवेदन त्यांनी केले होते. यावरून भाजप सरकारमध्ये एकाच खळबळ माजली होती. त्यानंतर मंत्री गोविंद गावडे यांच्या वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी दिला. त्याचबरोबर दामू नाईक,  माजी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मुख्यमंत्र्यांना कळविले की मंत्री गावडे यांना तातडीने मंत्रिमंडळातून काढून टाका. मात्र मुख्यमंत्री गप्पच राहिले. त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. याप्रकरणी दररोज प्रसारमाध्यमांनी अनेक माहिती उघड केली.

क्रांतिदिनीच हटविले मंत्री गोविंद गावडेंना 

मंत्री गोविंद गावडे यांनी 25 मे रोजी मुख्यमंत्र्यांवर जाहीरपणे टीका केली होती. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून हटविण्याची मागणीने जोर धरला होता. याबाबत केंद्रीय पक्षश्रेष्ठींनाही अहवाल पाठविण्यात आला होता. गेल्या दोन दिवसांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यास मान्यता दिली. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी मंत्री गावडे यांना स्वत:हून राजीनामा द्या, अशी सूचना केली. परंतु गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचे पालन केले नाही. अखेर 18 जून क्रांतिदिनी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना शिफारस केली आणि मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून वगळण्यास सांगितले.

कोणाच्या बापायचो फात?

मंत्री गावडे यांना काढून टाकणार असे वातावरण झाल्यानंतर गावडे यांनी कला अकादमीत आदिवासी नेत्यांना चर्चेला बोलावले, मात्र त्या चर्चेत कोणता निर्णय झाला हे कुणालाही कळू दिले नाही. फर्मागुडी येथे मंत्री गावडे यांच्या मतदारसंघातील काही कार्यकर्ते, माजी मंत्री प्रकाश वेळीप, काही आदिवासी कार्यकर्ते यांनी सभा घेतली. त्या सभेत कोणाच्या बापायचो फात? वगैरे निवेदने करून दामू नाईक तसेच भाजपच्या नेत्यांना जाहीर आव्हान देण्यात आले. या सभेस मंत्री गावडे हे गेले नव्हते, परंतु चांगलीच फील्डिंग लावली होती. या दुसऱ्या सभेमुळेही मंत्री अडचणीत आले.

सत्ता नव्हे, सत्याची बाजू घेणार 

“भरडलेल्या जनतेची बाजू आपण घेतली व त्याची पावती आपल्याला गोवा क्रांतिदिनी मिळावी यासारखे मोठे भाग्य दुसरे कोणते असूच शकत नाही. ज्या गोष्टीकरिता सरकारने ही भूमिका घेतलेली आहे, त्या संघर्षासाठी आपला आवाज आता खुला केला आणि त्यासाठी वाट मोकळी करून दिली. यासाठी सरकारचे आणि पक्षाचे आभार मानतो. सत्ता आणि सत्य यामधील निवड करायची असल्यास आपण सत्याचीच बाजू घेणार.”

  - गोविंद गावडे, आमदार प्रियोळ मतदार संघ

भाजप राज्य कार्यकारिणी आज होणार जाहीर

सायंकाळी हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणी तयार झाली असून पक्षश्रेष्ठींनी त्यास मान्यता दिली आहे. आज गुऊवारी संपूर्ण कार्यकारिणी जाहीर होण्याची शक्यता आहे. ही प्रदेश कार्यकारिणी गेले पंधरा दिवस पक्षश्रेष्ठींकडे मान्यतेसाठी प्रलंबित होती. तिला मान्यता मिळून ती पाठवण्यात आली असून प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक सदर नवीन कार्यकारिणी आज जाहीर करतील, असा अंदाज आहे.

कला अकादमीवरूनही होणार हकालपट्टी

संपूर्ण गोव्याचीच नव्हे, तर देशाची शान ठरलेल्या कला अकादमीच्या वास्तूप्रकरणी मंत्री गोविंद गावडे यांची भूमिकाही नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे. या वास्तूची रया गोविंद गावडे यांच्या कारकिर्दीतच गेली आहे. मात्र कला अकादमीला आता पुन्हा ‘अच्छे दिन’ येणार असून त्यासाठी गोविंद गावडे यांचे कला अकादमीवरील चेअरमनपद काढून घेतले जाणार आहे. गोव्यातील तमाम कलाकारवर्गाने आणि जनतेने देखील कला अकादमीवरून गोविंद गावडे यांची हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी केली होती. त्यांच्या मागणीस अखेर भाजप श्रेष्ठींनी मान्यता दिली.

कला अकादमीत आनंदीआनंद

मंत्री गोविंद गावडे यांनी कला अकादमीवर जो दरारा सुरू केला होता, त्याचा परिणाम कला अकादमीच्या कर्मचारीवर्गावर झाला होता. प्रचंड दबावाखाली कर्मचारी वावरत होते. अखेरीस मंत्री गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर कला अकादमीच्या कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

गोव्यात राजकीय हालचाली वेगवान,कोणाचे ‘बुरे दिन’, कोणाला ‘अच्छे दिन’,आणखी दोघांची जाणार मंत्रिपदे

मंत्री गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. गावडे यांच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. सभापती रमेश तवडकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्रा येथे आमदार मायकल लोबो यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित समारंभात बोलताना बुधवारी जाहीर केले की मायकल लोबो यांना अच्छे दिन येणार आहेत. उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. मंत्रिमंडळात सध्या तरी केवळ एकच जागा रिक्त आहे, मात्र ती भरून काढण्यासाठी फार मोठेसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. येत्या काळात मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार असल्याने नव्याने तीन मंत्री मंत्रिमंडळात सहभागी होतील, असे वृत्त हाती आले आहे. नीळकंठ हळर्णकर आणि आलेक्स सिक्वेरा या दोन्ही मंत्र्यांना वगळण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी मायकल लोबो आणि दिगंबर कामत यांची वर्णी लागू शकते. येत्या दोन दिवसांत बऱ्याच मोठ्या घडामोडी होतील. नव्याने शपथविधी किती जणांचा होईल याविषयी माहिती गुप्त ठेवण्यात आलेली आहे. मात्र विधानसभा अधिवेशनापूर्वी मोठे निर्णय होतील, हे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांचे भाकीत खरे ठरले आहे.

रमेश तवडकर होणार उपमुख्यमंत्री !

प्राप्त माहितीनुसार गोविंद गावडे यांच्या जागी रमेश तवडकर हे मंत्री होणार असून त्यांना उपमुख्यमंत्रीपदही दिले जाणार आहे. रमेश तवडकर लवकरच सभापतीपदाचा राजीनामा देतील. त्यानंतर सभापतीपदी कोण असा प्रश्न उपस्थित झाला असून समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई आणि सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांची नावे चर्चेत आहेत. मंत्रिमंडळाची मोठ्या प्रमाणात पुनर्रचना केली जाणार आहे. गोव्यातील आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात रमेश तवडकर आणि गणेश गावकर यांच्या बाजूने आहे. त्यामुळेच गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून अर्धचंद्र दिल्यामुळे त्याचा कोणताही परिणाम आदिवासी समाजावर होणार नाही, याची खात्री भाजपला आहे. मंत्रिमंडळाची पुनर्रचना करताना कदाचित सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील आणि त्यानंतर नव्याने मंत्रिमंडळाची फेररचना होऊ शकते. त्यात आणखी दोन मंत्र्यांना वगळण्याचाही प्रस्ताव आहे.

पक्षशिस्तीकडे तडजोड नाहीच : दामू

प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्याशी सायंकाळी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पक्षशिस्तीकडे कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही हे सुऊवातीपासूनच आपले धोरण होते आणि त्यामुळेच हा निर्णय जो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला आहे तो फार विचारपूर्वक घेतलेला आहे. मंत्रिमंडळात कोणाला ठेवावे व कोणाला वगळावे हा अधिकार पूर्णत: मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो. मुख्यमंत्री जो काही निर्णय घेतात तो पक्षाला विचारूनच घेत असतात. या निर्णयाद्वारे जे कोणी पक्षाच्या धोरणावर किंवा सरकारच्या निर्णयावर टीका करतील, त्यांच्यासाठी हा एक धडा आहे. मंत्री गावडे यांच्याबाबत जो काही अहवाल होता, तो पक्षाकडे पाठवून देण्याची जबाबदारी आपली असते ती आपण पार पडलेली आहे. जर कारवाई झाली नसती तर चुकीचा संदेश सर्वत्र पसरला असता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच, आहे असे प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक म्हणाले.

Advertisement
Tags :

.