For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंत्री गावडे - सभापती तवडकर यांच्याकडे चर्चा करणार : तानावडे

10:55 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मंत्री गावडे   सभापती तवडकर यांच्याकडे चर्चा करणार   तानावडे
Advertisement

दोघांतील वाद घरातील असल्याचा दावा

Advertisement

मडगाव : कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे आणि सभापती रमेश तवडकर हे सरकारातील घटक आहेत आणि संपूर्ण राज्याशी निगडीत आहेत. तरीसुद्धा त्यांच्यातील वाद हा भाजपच्या घरातील वाद असल्याचा दावा काल प्रदेश भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी मडगावात पत्रकार परिषदेत केला. कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यावर सभापती रमेश तवडकर यांनी भ्रष्टाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्या संदर्भात पत्रकारांनी सदानंद तानावडे यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, तानावडे म्हणाले की, दोघांतील वाद हा संवेदनशील विषय आहे. आपण स्वत: उद्या रविवारी किंवा सोमवारपर्यंत दोघांकडे चर्चा करणार आहे. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांकडे देखील या विषयावर बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री हा विषय सोडवतील.

विधानसभा अधिवेशन सुरू असताना सभापतींनी सरकारातील एका मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्याचा प्रकार गोव्यातील राजकारणात प्रथमच घडला आहे. विधानसभा अधिवेशन सुरू नसताना हा वाद झाला असता तर त्याला फार असे महत्त्व प्राप्त झाले नसते. मात्र, विधानसभा अधिवेशन सुरू असताना गंभीर स्वरूपाचा आरोप झाल्याने, या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झालेले आहेत. गोवा फॉरवर्ड व काँग्रेस पक्षाने कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा व चौकशीला सामोरे जावे असे म्हटले आहे. सभापती रमेश तवडकर हे आपल्या भूमिकेशी ठाम आहेत. जो प्रकार घडला तो अत्यंत चुकीचा आहे. कार्यक्रम करण्यासाठी पैसे दिले जातात व कार्यक्रमच कुठे सादर होत नाही. यातून काय बोध घ्यायचा असा सवाल सभापती तवडकर यांनी खुद्द मुख्यमंत्र्यांकडे उपस्थित केलेला आहे.

Advertisement

सार्वजनिक निधीची लूट हा ‘अंतर्गत मामला’ कसा? : विजय सरदेसाई यांचा सवाल

सभापती रमेश तवडकर आणि कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्यात सुरू असलेला वाद हा त्यांचा ‘अंतर्गत मामला’ आहे, अशी सारवासारव केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यावर गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी टीका केली आहे. राज्य विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना सभापती रमेश तवडकर आणि मंत्री गोविंद गावडे यांच्यात सार्वजनिक निधीच्या लुटीच्या प्रकरणातून निर्माण झालेला वाद विरोधकांच्या पथ्यावर पडला आहे. तशातच तवडकर आणि गावडे यांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. हा प्रकार पक्षशिस्तीत बसणारा नसल्यामुळे तो सोडविण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे श्री. तानावडे यांनी शनिवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या पार्श्वभूमीवर अनेक विरोधकांसोबत सरदेसाई यांनीही टीका करण्याची संधी घेताना सार्वजनिक निधीची लूट आणि खात्यातील आर्थिक घोटाळा हा एखाद्याचा अंतर्गत किंवा कौटुंबिक मामला होऊ शकत नाही, असे म्हटले आहे. तानावडे यांच्या सदर वक्तव्यावर त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे. काणकोण मतदारसंघातील काही संस्थांना सुमारे 26 लाख निधी देण्यावरून सदर वाद उफाळला होता. त्यानंतर सभापती तवडकर यांनी त्यास दुजोरा देणारे वक्तव्य केले होते. त्यासंबंधी पत्रकारांनी मंत्री गावडे यांना विचारले असता निधी वाटपात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप त्यांनी फेटाळले होते. आपण कोणत्याही चौकशीस सामोरे जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

Advertisement
Tags :

.