मंत्री हो... पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सना भेट द्या
बॅरिकेड्स हटविण्यासंदर्भात पत्रव्यवहार
बेळगाव : पहिले रेल्वेगेट टिळकवाडी येथील हटविण्यात यावे, यासाठी गेल्या साडेअकरा वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने केली जात आहेत. मात्र, बॅरिकेड्स काही केल्या हटले नाहीत. त्यातच सोमवारपासून बेळगावात सरकारच्या विधीमंडळाचे अधिवेशन भरणार आहे. त्यामुळे मंत्री महोदयांनी स्वत: पहिले रेल्वे गेटवरील बॅरिकेड्सची पाहणी करून समस्या मार्गी लावावी, यासाठी रविवारी सकाळी पुन्हा आंदोलन करण्यात आले. पहिले रेल्वेगेटवर 19 जून 2014 रोजी 10 बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे याचा नाहक त्रास स्थानिक रहिवासी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी त्याचबरोबर पाळीव जनावरांना होत आहे. वाहनचालकांना 2 कि. मे. अधिक प्रवास करावा लागत आहे. काँग्रेस सरकारच्या काळातच काँग्रेस रोडवर अन्याय होत आहे, असा आरोप केला जात आहे.
कर्नाटकचे राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री, नगरविकास मंत्री, विरोधी पक्षनेते, सभापती, पालकमंत्री, आमदार, खासदार, जिल्हाधिकारी, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, अतिरिक्त महासंचालक यांना बॅरिकेड्स संदर्भात निवेदन दिले आहे. मात्र त्याचा काही उपयोग झालेला नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मानव आयोग हक्क, कर्नाटक आयोग हक्क यांच्याकडून बॅरिकेड्स हटविण्याबाबत आदेश आले आहेत, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. आजपर्यंत 40 वेळा आंदोलने करण्यात आली. बॅरिकेड्स संदर्भात मंत्रीमहोदयांना 200 पानी निवेदन पाठविण्यात आली आहेत. त्यामुळे बॅरिकेड्सचा विषय या अधिवेशनात उपस्थित करावा व स्वत: भेट देऊन पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत असून, अधिवेशन संपल्यानंतर पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन छेडले जाणार आहे. यावेळी सुभाष घोलप, अजित नाईक, सुमंत धारेश्वर, दीपक गवंडळकर, अमित जोशी, प्रशांत सुगंधी, रमेश फाटक, संतोष देशपांडे आदी उपस्थित होते.